होमपेज › Sangli › वाहतुकीसाठी पंधरा दिवसात अ‍ॅक्शन प्लॅन

वाहतुकीसाठी पंधरा दिवसात अ‍ॅक्शन प्लॅन

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:45PMसांगली  : प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रातील वाहतूक, पार्किंग, आठवडा बाजार, रस्त्यावरील अतिक्रमणे आदी संदर्भात पंधरा दिवसात अ‍ॅक्शन प्लॅन तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी. अतिक्रमण करणार्‍यांना नोटीसा द्याव्यात आणि  आढावा घेण्यासाठी पुन्हा महिन्यानंतर बैठक घ्यावी असा निर्णय  मंगळवारी या प्रश्‍नासंदर्भातील बैठकीत घेण्यात आला.  सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीस महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, महेश खराडे, उमेश देशमुख, आशिष कोरी, अमर पडळकर,  आसिफ बावा, तानाजी रुईकर, उत्तम कांबळे, नितीन चव्हाण, महेश पाटील, आनंद देसाई, वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेचे प्रमुख अतुल निकम, महापालिका, बांधकाम विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.  

कृती समितीच्या सदस्यांनी महापालिका क्षेत्रात पार्किंगसाठी असलेले आरक्षण, रस्त्यावर झालेले अतिक्रमण, रस्त्यावरील बाजार आदी प्रत्येक मुद्दांचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जनतेच्या सोयीसाठी वाहतूक व पार्किंगचे नियोजन  आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेबरोबरच पोलिस व वाहतूक विभागाने संयुक्तरित्या नियोजन व कार्यवाही करायला हवी.   प्लॅन तयार केल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.  आयुक्त  खेबुडकर म्हणाले, शहरात टीडीआर धोरण  येत्या काही दिवसात  लागू होणार आहे शहरासाठी स्वतंत्र पार्किंग धोरणाचा विचार करू. रस्त्यावर वाहने राहणार नाहीत, यासाठी मनपा नियोजन करेल.पार्किंगसाठीचे ठेके गेल्या दोन वर्षांत भरले नाहीत. त्यासाठी संबंधितांनी पुढे येणे गरजेचे आहे. ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव पाठवला आहे. शंभर फुटी रस्त्यावर कामे हाती घेण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी भूमिगत केबलचे काम केले  आहे.   

शहर विकास आराखडा, शहरातील पार्किंगसाठी 28 आरक्षित भूखंड, पार्किंगचे बंद ठेके, अधिसूचना असलेल्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक, अतिक्रमणमुक्त शहर, अवजड वाहनांची वाहतूक, अवैध वडाप वाहतूक,  अनावश्यक गतीरोधक, सम विषम तारखेस पार्किंग व सिग्नलची व्यवस्था,   किरकोळ विक्रेते, पथविक्रेता धोरण,  आठवडा बाजार, आठवडा बाजारामध्ये शेतकर्‍यांसाठी जागा आरक्षण, खोकी पुनर्वसन, वर्दळीच्या रस्त्यावर नो व्हेईकल झोन, स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन पथकाची स्थापना, वाहतूक कर्मचार्‍यांची वर्तणूक अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

 विक्रेत्याबरोबर बड्यांवरही कारवाई कधी?

बैठकीत कृती समितीचे अनेक सदस्य आक्रमक झाले. केवळ सामान्य विक्रेत्यांवर कारवाई करु नका. एचएसफसी मेगामॉल, भारती हॉस्पिटल, चित्रपटगृह  आदि ठिकाणी बेकायदा पे पार्किंग सुरू आहे.  हॉटेल ग्रेट मराठा, पर्ल, खिचली, सिझन फोर, हॉटेल कृष्णा, दवाखाने, अपार्टमेंट आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही.  त्यांच्यावर कधी आणि काय कारवाई करणार, असा सवाल करण्यात आला. त्यावर जिल्हाधिकारी पाटील आणि आयुक्त खेबूडकर यांनी त्यांना नोटीस काढण्यात येतील . त्यांच्यावरही कडक करवाई करण्यात येईल, असे सांगितले.