Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Sangli › सर्वांनाच धास्ती ‘कुर्‍हाडीच्या दांड्यां’ची!

सर्वांनाच धास्ती ‘कुर्‍हाडीच्या दांड्यां’ची!

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 07 2018 9:11PMसांगली : सुनील कदम

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असताना काँग्रेस- राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांना धास्ती सतावते आहे ती ‘कुर्‍हाडीच्या दांड्यांची’! कारण ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ या न्यायाने काही उमेदवारांच्या राजकीय कोलांटउड्या काही पक्षांना त्रासदायक ठरत आहेत.तर मातब्बरांच्या वेगवेगळ्या राजकीय तालमीत तयार झालेले काही नवखे उमेदवार त्याच त्या प्रस्थापितांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. 

असे म्हणतात की ‘घर फिरले की घराचे वासे पण फिरतात’! या म्हणीचा सर्वाधिक प्रत्यय येत आहे तो काँग्रेसला. कारण तत्कालीन सांगली नगरपालिका आणि त्यानंतरच्या महापालिकेत सर्वाधिक काळ काँग्रेसच सत्तेवर होती.  आज सर्वच राजकीय पक्षांकडे बिनीचे शिलेदार म्हणून वावरणारी मंडळी ही मूळची काँग्रेस पक्षाच्या किंवा स्व. मदनभाऊ पाटील यांच्या तालमीत तयार झालेली दिसून येतात. मदन पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या या सहकार्‍यांना नगरसेवक, वेगवेगळ्या समित्यांचे सभापतीपद, स्थायी समिती सभापतीपद, महापौर अशा चढत्या कमानीने संधी दिल्या. पण काळाच्या ओघात आणि वेगवेगळ्या कारणांनी यापैकी अनेकजण आज काँग्रेसविरोधी गटात सामील झालेले दिसतात. 

केवळ काँग्रेसमुळेच महापालिकेत ज्यांना महापौरपदासारखी सर्वोच्च संधी मिळाली, स्थायी समितीसारखे अत्यंत महत्वाचे पद लाभले, अशा मंडळींनी आज भाजपशी हातमिळवणी करून महापालिकेत भाजपची सत्ता आणण्याचा विडा उचललेला दिसतो आहे, तर काही मंडळी राष्ट्रवादीशी मेतकूट करून सत्तेचा सारीपाट मांडण्यात मश्गूल असलेली दिसतात. 
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी ज्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा श्रीगणेशा शिकविला अशीही काही मंडळी आज काँग्रेस सोडून दुसर्‍याच पक्षाची तळी उचलताना दिसत आहेत. काँग्रेसच्या गोटात आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ‘फिरलेल्या वाशांबद्दलची’ सल वारंवार बोचताना दिसत आहे. त्यामुळे आज मदनभाऊ असते तर वेगळे चित्र दिसले असते, असेही काहीजण बोलून दाखवितात.

महापालिकेच्या राजकारणात महाआघाडीचा प्रयोग करताना माजी मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसमध्ये दुखावलेले गेलेले आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षातून आलेले, आजपर्यंत कधीही संधी न मिळालेले अनेकजण महाआघाडीत सामावून घेतले होते. महाआघाडीच्या काळात यापैकी काहींना वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली, जी एरव्ही त्यांना सहजासहजी मिळणे शक्य नव्हते. पण महाआघाडीच्या किंवा राष्ट्रवादीच्या माध्यमातून संधी मिळालेल्यांपैकीही काहीजण आज राष्ट्रवादीसोबत राहिले नसल्याचे दिसते आहे. काळाच्या ओघात किंवा राजकीय सोयीसाठी महाआघाडी किंवा राष्ट्रवादीतील अनेकजण आज काँग्रेस किंवा भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसत आहेत.

माजी आमदार संभाजी पवार यांनी आपल्या राजकीय तालमीत अनेक   अस मातब्बर मल्ल घडविले की  ज्यांनी पुढे जाऊन महापालिकेच्या राजकारणात आपली वेगळीच छाप पाडली. संभाजी पवार जो म्हणतील तो आपला शब्द आणि संभाजी पवार म्हणतील तो आपला राजकीय पक्ष, अशी या कार्यकर्त्यांची ख्याती आणि राजकीय वाटचाल होती. पण एक एक करीत संभाजी पवारांचे झाडून सगळे मोहरे गळत गेले किंवा इतर राजकीय पक्षांच्या तालमीत दाखल झाले. त्यामुळे आजघडीला   संभाजी पवारांचा एकही जुनाजाणता पठ्ठा राजकीय वाटचालीत त्यांच्या सोबत असलेला दिसत नाही. आज संभाजी पवार लौकिकार्थाने जरी शिवसेनेत असले तरी त्यांच्या मुशीत तयार झालेले फारच थोडे शिवसैनिक तिथे दिसून येतात. उलट संभाजी पवारांनी ज्यांची राजकीय कारकीर्द घडविली आणि ज्यांच्या राजकीय कारकिर्दीला आकार दिला, अशी बहुसंख्य मंडळी आज विरोधी गोटातच दिसून येतात, याची सल निश्‍चितच त्यांच्या मनात सलत असणार, यात शंकाच नाही.

महापालिकेच्या राजकारणात काही ठिकाणी असेही चित्र दिसत आहे की वस्ताद एका तालमीत आणि जमुरा किंवा पठ्ठा दुसर्‍याच तालमीत. ज्याला सगळे राजकीय डावपेच शिकवले तोच शागीर्द आपल्याच वस्तादाविरूध्द दंड थोपटताना दिसत आहे.  अशा सामन्यात वस्ताद टांग मारणार की शागीर्दच वस्तादाला धोबीपछाड  देणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. एकूणच काय तर फिरलेल्या घरांचे वासे आणि आपल्याच मुळावर उठलेले कुर्‍हाडीचे दांडे राजकीय पक्षांसह अनेक उमेदवारांना घायाळ करताना दिसत आहेत. 

निष्ठा गेल्या धोबीघाटावर आणि विश्‍वास पानिपतात!

आज काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपकडून उमेदवारी मागणार्‍या बहुसंख्य उमेदवारांनी उपर्‍यांना फारसे महत्व न देता मूळच्या निष्ठावंतांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे. मात्र महापालिकेच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून रंगलेला आयाराम-गयारामांचा ताकतुंबा बघितल्यावर कोणत्या राजकीय पक्षातील ‘मूलनिवासी’ कोण, असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, या तीनही प्रमुख राजकीय पक्षांची कमान आज ज्यांना मूळचे किंवा जुने म्हणावे अशा लोकांच्या हाती राहिलेली दिसत नाही. आजघडीला या प्रमुख पक्षांची बहुतांश सुत्रे याच आयाराम-गयारामांच्या हातात गेलेली दिसत आहेत.त्यामुळे मूळच्या निष्ठावंतांवर ‘निष्ठा गेली धोबीघाटावर आणि विश्‍वास हरवला पानिपताच्या लढाईत’ असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.