Wed, Jul 17, 2019 18:40होमपेज › Sangli › मनपा निवडणुकीची प्रभागरचना अंतिम

मनपा निवडणुकीची प्रभागरचना अंतिम

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभागरचनेवर राज्य निवडणूक आयोगाने शिक्‍कामोर्तब केले आहे.  नागरिकांच्या 63 पैकी एकाच हरकतीची दखल निवडणूक आयोगाने घेतल्याचे निवडणूक अधिकारी आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत सांगितले. त्यामुळे आरक्षण आणि प्रभागरचनेत कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

खेबुडकर म्हणाले, आयोगाने एकमेव बदल मान्य केला आहे. त्यामध्ये प्रभाग 8 व 19 मध्ये एकच 47 क्रमांक प्रगणक गट होता. त्यामुळे सांगली-मिरज मुख्य महामार्ग ओलांडून 75 लोकांना मतदानासाठी प्रभाग 19 मध्ये जावे लागत होते; परंतु निवडणूक आयोगाने हरकतीनुसार विशेष बाब समजून प्रगणक गट फोडून 75 लोकसंख्या प्रभाग 8 कडे वळविली आहे. ते म्हणाले, महापालिकेने 78 भावी नगरसेवकांसाठी चार सदस्यीय 18, तर तीन सदस्यीय दोन 20 प्रभाग आणि त्यांची भागरचना केली होती. त्यानुसार प्रभागनिहाय ड्रॉ पद्धतीने आरक्षणही काढण्यात आले होते. याबाबत नागरिकांकडून हरकती मागविल्या होत्या. त्यावर निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी सांगलीत येऊन सुनावणी घेतली होती. त्यावेळी 62 हरकती आल्या होत्या. त्यापैकी एकमेव हरकत मान्य करण्यात आली. उर्वरित 8 अंशतः तर 7 वर्णनात्मक (भागाच्या उल्लेखाबाबत त्रुटी) मान्य करण्यात आल्या. अर्थात, प्रभाग 8 मध्ये 75 लोकसंख्या वाढली, तरी हे सर्व 10 टक्के कमी-जास्तच्या निकषात बसते. त्यामुळे कुठेही प्रभागरचना, आरक्षणाला धक्‍का लागलेला नाही.

खेबुडकर म्हणाले, आता दि. 11 मेअखेर 18 वर्षे पूर्ण झालेल्या आणि मतदार यादीत समाविष्ट नसलेल्यांच्या याद्या दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यानुसार 21 मेअखेर  प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्याचे काम होईल. त्यानंतर त्यावर हरकती-सूचना मागवून निवडणूक आयोग ते अंतिम करतील. या कामाला विधानसभा किंवा मनपा निवडणूक आचारसंहितेची कोणतीही अडचण येत नाही. यावेळी उपायुक्‍त सुनील पवार, स्मृती पाटील, जनसंपर्क अधिकारी श्री. हर्षद आदी उपस्थित होते.