Thu, Apr 18, 2019 16:20होमपेज › Sangli › निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भूखंडाचे श्रीखंड

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भूखंडाचे श्रीखंड

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:56PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा कोट्यवधी रुपयांचे खुले भूखंड श्रीखंड ओरपण्याचा उद्योग सुरू झाला आहे. अशा मोक्याच्या जागा काही खासगी संस्थांना नाममात्र भाडेपट्ट्याने 29 वर्षे मुदतीने देण्याचे प्रस्ताव दि.20 फेब्रुवारीरोजी होणार्‍या महासभेसमोर ठेवले आहेत. यामध्ये आभाळमाया फौंडेशन, रामदास आठवले युथ फौंडेशन तसेच प्राथमिक शिक्षक बँकेसारख्या संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे हे विषय महासभेत वादळी ठरण्याची शक्यता आहेत.

शहरातील  कोट्यवधी रुपयांच्या अनेक मोक्याच्या जागा जागा विकसित करण्याच्या नावे  यापूर्वी काही संस्थांच्या घशात घातल्या आहेत. त्यातून महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत शासकीय लेखापरीक्षणांतही ताशेरे ओढले आहेत. त्यातील काही जागा ताब्यात घेण्याचे आदेशी झाले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही.  असे असताना पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर भूखंड बाजार सुरू झाला आहे. 

यामध्ये कुपवाड येथील सिटी सर्व्हे नंबर 3630 मधील 1289.70 चौरस मीटरची खुली जागा आभाळमाया फौंडेशन या संस्थेला देण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना विभागाने वार्षिक चाळीस हजार रूपये भाडे निश्चित केले आहे. या विषयाला मान्यता देण्याचा प्रस्ताव महासभेच्या अजेंड्यावर आहे. यापूर्वी महापालिकेच्या खुल्या जागा खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव महासभेत आला होता. त्यांना नाममात्र भाडे देखील आकरण्यात येणार होते. मात्र या विषयांवरून महासभेत गदारोळ झाला होता. स्वयंसेवी संस्थांच्या नावे होणारा हा बाजार रोखण्याचाही यासंदर्भात निर्णय झाला होता. त्यामुळे जागा भाड्याने देऊ नयेत व यापूर्वी दिलेल्या जागा ताब्यात घ्याव्यात, असा निर्णय झाला होता.

आता पुन्हा दोन वर्षांपूर्वीच्या विषयपत्रानुसार आभाळमाया संस्थेला जागा देण्याचा विषय महासभेसमोर आला आहे. वॉर्ड क्रमांक 38 मधील दोन खुल्या जागा खासदार रामदास आठवले युथ फौंडेशनला 9 वर्षे मुदतीवर भाड्याने देण्यात येणार आहे. तर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाला अभ्यासिका, वाचनालय व गुणवत्तावाढीसाठी सर्व्हे क्रमांक 367 (ब) ची इमारत भाडेतत्वावर देणे व त्याचे भाडे निश्चित करण्याचा विषय देखील महासभेच्या विषयपत्रिकेवर आहे. या जागा भाड्याने देण्याच्या विषयावरून महासभेत पुन्हा वादंग होईल अशी शक्यता आहे.

मिरजेत विद्यानगर येथे बोटॅनिकल गार्डन तयार करण्यासाठी व दैनंदिन या गार्डनची देखभाल करण्यासाठी बल्लारी चॅरिटेबल ट्रस्टला तीन वर्षांसाठी मनपाची जागा देण्यात येणार आहे. तसेच खणभाग येथील सिटी सर्व्हे नंबर 1/28/ब/1 मंजूर विकास योजनेमधील आरक्षण क्रमांक 220 मधील अंशतः बाधित होणार्‍या जागेवरील आरक्षण वगळण्याचा विषय महासभेत आला आहे. हे सर्वच विषय  वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.