Thu, Jul 18, 2019 02:45होमपेज › Sangli › महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:46PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने त्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. दि. 20 मार्चला  प्रारूप आराखडा जाहीर करण्याचे महापालिकेला आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अव्वर सचिव नि. ज. वागळे यांनी दिले आहेत. त्याच दिवशी अनुसूचित जाती व नागरिकाचा मागास प्रवर्गाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात मतदान-मतमोजणी होणार आहे. 

महापालिकेच्या सातव्या टर्मसाठी आता निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, मनसे, सांगली जिल्हा सुधार समिती, महापालिका संघर्ष समितीसह अनेक पक्ष, आघाड्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्याद‍ृष्टीने प्रत्येकाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अर्थात, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सर्वांनाच उमेदवारी वाटप, उमेदवार मिळविणे, तसेच जनतेपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. 

विद्यमान महानगर मंडळ (कौन्सिल) ची मुदत 13 ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवे मंडळ अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. चार सदस्यीय प्रभागांची रचना असणार आहे. चार सदस्यीय समान प्रभाग करण्यास अडचण असल्यास एखादा प्रभाग प्रभाग 3 किंवा 5 सदस्यांचा होऊ शकतो.

आरक्षणांसह प्रभागरचनेचा समतोल साधण्याच्या सूचना आयोगाने महापालिका आयुक्‍तांना दिल्या आहेत. यामध्ये आरक्षित प्रभागांचे जागावाटप आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत अवलंबावी, असे आदेश  आहेत. वास्तविक प्रभागरचना करण्यासाठी प्रशासनाला   एक महिना विलंबाने  आदेश आले आहेत. निवडणूक आयोगाने  प्रारूप प्रभागरचना करण्यासाठी महापालिका प्रशासनाला केवळ 15 दिवसांची मुदत दिली आहे. 

प्रशासनाने प्रारूप प्रभागरचा व आरक्षणाचा प्रस्ताव तयार  करून  दि. 17 फेब्रुवारीपर्यंत पाठवायचा आहे. त्यानुसार दि. 20 मार्चपर्यंत प्रभागरचना निश्‍चिती, आरक्षणे जाहीर होतील. त्यानंतर त्यावर हरकती-सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम प्रभागरचना 2 मेपर्यंत निश्चिचत होणार आहे. 

या कार्यक्रमानुसार मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागू होईल. जुलैच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात  मतदान होईल.