Wed, Jul 24, 2019 12:05होमपेज › Sangli › विजेच्या धक्क्याने मनपा कर्मचार्‍याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने मनपा कर्मचार्‍याचा मृत्यू

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 10:53PMमिरज : प्रतिनिधी

येथील इदगाहमधील  दफनभूमीत बोअर दुरुस्तीचे काम करीत असताना विजेचा धक्का बसून  महापालिकेचे कर्मचारी संजय तुकाराम ओमासे (वय 42, रा. बेडग, ता. मिरज) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ओमासे यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जुबेर चौधरी व माजी नगरसेवक आरीफ चौधरी यांच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

ओमासे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍यांंविरुद्ध कारवाई करावी व त्यांच्या नातेवाईकाला नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी दिवसभर नातेवाईक व बेडग (ता. मिरज) येथील कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.  आयुक्‍तांनी समक्ष येऊन कारवाईचे ठोस आश्‍वासन द्यावे, अशी मागणी केली. परंतु आयुक्‍त रविंद्र खेबुडकर रुग्णालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे जमाव संतप्त बनला होता. सायंकाळी उपायुक्‍त स्मृती पाटील यांनाही घेराव घालण्यात आला. 

इदगाहनगर येथील दफनभूमीमध्ये बोअर दुरुस्ती करण्याचे काम प्रभाग क्र. 3 मधील वायरमन राजू मस्के  व हेल्पर संजय ओमासे यांच्याकडे  सोपविण्यात आले होते. शनिवारी सकाळी काम सुरू असताना ओमासे यांना 1100 केव्ही उच्च दाबाचा विजेचा धक्का बसला. त्यामध्ये मस्के व ओमासे हे दोघे जखमी झाले. परंतु ओमासे यांना विजेचा जोरदार झटका बसल्याने त्यांची स्थिती गंभीर होती. तशाही परिस्थितीत मस्के यांनी ओमासे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु ओमासे यांचा मृत्यू झाला होता.

ही घटना समजल्यानंतर ओमासे याचे नातेवाईक व बेडगमधील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. ओमासे यांना काम सांगणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी सुरू केली. रुग्णालय आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ओमासे यांच्या नातेवाईकांना एक महिन्याच्या आत महापालिका सेवेत दाखल करुन घेण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान, मृत ओमासे यांचा भाऊ  मोहन  यांनी नगरसेवक जुबेर चौधरी व माजी नगरसेवक आरीफ चौधरी यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. या दोघांनी संजय यांना जबरदस्तीने दफनभूमीतील विद्युत जोडणीचे काम करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला , असे त्यांनी  पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  आरीफ चौधरी म्हणाले, राजकीय हेतूने माझ्यासह  जुबेर चौधरी यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.