Thu, Jun 20, 2019 21:04होमपेज › Sangli › निवडणूक सांगलीची; चांदी जयसिंगपूरची!

निवडणूक सांगलीची; चांदी जयसिंगपूरची!

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 11:27PMसांगली : अभिजित बसुगडे

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी, दिवस-रात्र असणारी पोलिसांची नाकाबंदी यामुळे निवडणूक सांगली महापालिकेची आणि चांदी मात्र जयसिंगपूरची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, मिरजेतील कार्यकर्त्यांनी जेवणावळींसाठी जयसिंगपूरमधील हॉटेल, ढाबे जवळ केल्याने तेथील हॉटेल चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे इच्छुकांचीही डोकेदुखी काही प्रमाणात कमी झाली आहे. 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक ऐन रंगात आली आहे. पदयात्रा, प्रचार फेर्‍या, आरोप-प्रत्यारोपाने रान उठवण्यात आले आहे. वातावरण तापलेले असतानाच आचारसंहितेची कडक अंमलबजावणी आणि पोलिसांची सातत्याने असणारी नाकाबंदी यामुळे कार्यकर्त्यांची ‘सोय’ कशी करायची असा प्रश्‍न इच्छुक उमेदवारांना पडला होता. मात्र, त्यांनी त्यावर नामी शक्कल काढली आहे. कार्यकर्त्यांना सरळ जयसिंगपूरमधील हॉटेल, ढाब्यांचे पास दिले जात आहेत. 

सांगलीत कुपवाड रस्त्यावरील रत्ना डिलक्स हॉटेलमध्ये पोलिसाचा खून झाल्यानंतर त्या हॉटेलचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. शिवाय मालकासह व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. याचा सर्वच हॉटेल चालकांनी धसका घेतला आहे. त्यात पोलिस आणि प्रशासनाने कडक निर्बंध आणल्याने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील हॉटेल, ढाबे रात्री दहालाच बंद होत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची ‘सोय’ होत नाही. त्याचा फटका उमेदवारांना बसत होता. त्यामुळेच तीनही शहराशेजारी असणार्‍या गावांत आता ती ‘सोय’ केली जात आहे.  यामध्ये सर्वाधिक प्रमाणात कार्यकर्ते जयसिंगपूरला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जयसिंगपूरच्या हॉटेल, ढाब्यांवर सांगलीकर कार्यकर्त्यांची वर्दळ चांगलीच वाढली आहे. यासाठी उमेदवारांनी आपले मित्र, नातेवाईकांतर्फे हॉटेल चालकांशी संपर्क साधून कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. त्यामुळे रात्री कार्यकर्त्यांचे जथ्थे जयसिंगपूरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. त्याशिवाय माधवनगर, तानंग फाटा, पंढरपूर रस्ता, इस्लामपूर रस्त्यावरील हॉटेल, ढाब्यांवरही कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे.  जेवणावळींसाठी कार्यकर्त्यांच्या म्होरक्याकडे पास किंवा थेट आर्थिक रसदच पुरवली जात आहे.

त्यातूनच त्याला सगळी ‘सोय’ करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत. त्यामुळे सांगलीत नाकाबंदी, आचारसंहितेची अंमलबजावणी होत असली तरी कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच पर्यायी ‘सोय’ झाल्याने त्यांच्यातही आनंदाचे वातावरण आहे. सांगलीची निवडणूक असूनही जयसिंगपूरमधील व्यावसायिकांना फायदा होत असल्याने त्यांच्यातही आनंदाचे वातावरण आहे. काही हॉटेल चालकांनी आता सवलतीत सेवा देण्यासाठी उमेदवारांशी संपर्क साधण्यासही सुरुवात केली आहे. निवडणुकीची रणधुमाळी वाढत जाईल तशी जेवणावळीही वाढत जाणार असल्याची चर्चा आहे. 

पोलिसांची नाकाबंदी वाढणार...

सध्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात बारा ठिकाणी रात्री आठ ते बारा दरम्यान पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. शिवाय दिवसभरही तीनही शहरात नाकाबंदी सुरू असते. शहरात येणार्‍या प्रत्येक मार्गावर नाकाबंदी केली जात आहे. आता ही नाकाबंदी वाढवणार असल्याचे संकेत पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिले आहेत. त्यामुळे शहराबाहेर जेवणावळींसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना या नाकाबंदीच्या दिव्यातून जावे लागणार आहे.