Sun, May 26, 2019 00:48होमपेज › Sangli › मनी दाटला ‘संशयकल्लोळ’!

मनी दाटला ‘संशयकल्लोळ’!

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 7:47PMसांगली : सुनील कदम

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात संशयकल्लोळाचा खेळ जोरात रंगात आल्याचे दिसत आहे. आघाडी करायला निघालेल्या दोन्ही काँग्रेसचा परस्परांवर, भाजपचा त्यांचे मुख्य आशास्थान असलेल्या संभाव्य आयारामांवर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बहुसंख्य उमेदवारांचा तर चक्क आपापल्या नेत्यांवरच विश्‍वास राहिला नसल्याचे आढळून येत आहे. सगळ्याच गोटात नुसते संशयकल्लोळाने थैमान मांडल्याचे दिसत आहे.

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आघाडीसाठी आणि जागा वाटपासाठी चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस तोंडावर येऊन ठेपला आहे तरी अजून त्यांच्यात चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच आहे. याची अनेक कारणे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपशी असलेले मधुर संबंध आणि वेगवेगळ्या पातळीवर अधून-मधून त्यांच्यात होणारी सलगी  ही राज्यातील जनतेला नवीन नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी मित्रपक्ष काँग्रेसच्या गोटातही संशयाचे वातावरण आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून 35 ते 40 जागांची मागणी लावून धरण्यात आलेली आहे. मात्र काँग्रेसच्या गोटातून या मागणीला जोरदार विरोध होत आहे. पंचवीस ते अठ्ठावीस जागांपेक्षा त्यांना अधिक जागा सोडायला काँग्रेस तयार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेस नेत्यांच्या मनात असलेली राष्ट्रवादीविषयीची साशंकता. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जर भाजपशी हातमिळवणी करून काँग्रेसलाच सत्तेपासून दूर ठेवले तर काय करायचे, याची चिंता काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात घर करून बसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या ना त्या निमित्ताने राष्ट्रवादीला कमीत कमी जागा देण्याकडे काँग्रेसचा कल असल्याची चर्चा आहे.

भाजपची महापालिकेतील फार मोठी मदार काँग्रेस-राष्ट्रवादीतील संभाव्य आयारामांवर अवलंबून असल्याचे उघड सत्य आहे. त्यामुळेच भाजपनेसुध्दा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी अजून आपल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केलेली नाही. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या गोटात काय घडते, त्यांची आघाडी होते की नाही, आघाडी झाली तर कुणाला किती जागा मिळणार, जागा वाटपानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या कोणत्या उमेदवारांना संधी देणार, संधी न मिळाल्यास या दोन पक्षातील कोण कोण मातेब्बर बंडखोरी करणार या सगळ्या घडामोडींवर भाजपची नेतेमंडळी कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. यापैकी काही संभाव्य बंडखोरांनी

या निवडणुकीत सगळेच नवीन

महापालिकेच्या या निवडणुकीत अनेक नव्या गोष्टी घडत आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची पध्दत याच निवडणुकीत प्रथम अंमलात येते आहे. तसेच आघाडीच्या चर्चेचे गुर्‍हाळ, प्रत्येक पक्षातर्फे इच्छुकांच्या शक्तीप्रदर्शनाने मुलाखती असे प्रकारही प्रथमच होत आहेत. यापूर्वी काँग्रेसने कधी आघाडी करून निवडणूक लढवली नव्हती. सन 2008 च्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीसह सर्व काँग्रेस विरोधकांची मोट बांधली होती. महाआघाडी त्या निवडणुकीत मैदानात उतरली होती आणि काँग्रेसला सत्तेवरून दूर व्हावे लागले होते. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोरासमोर लढले होते. ती राजकीय लढाई जबरदस्त अशी झाली होती.

विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष राज्यातील आघाडी सरकारमध्ये एकत्र काम करीत होते, मात्र परस्परांच्या विरोधात त्यांंच्या नेत्यांनी प्रचारसभांत जोरदार टीकास्त्रे सोडली होती. याखेपेस मात्र त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आघाडी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरत असलेल्या भाजपमुळे दोन्ही काँग्रेसला एकत्र येण्याची वेळ आली आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कधी नव्हे ते मातब्बर आणि इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या उमेदवारांची डिमांड चांगलीच वाढलेली दिसत आहे. एखाद्या सुसंस्कृत आणि सालस वराच्या घराभोवती वधूपित्यांनी फेर धरावा, तसे बहुतेक राजकीय पक्ष असल्या उमेदवाराने आपल्याकडे यावे, यासाठी त्याची मनधरणी करताना दिसत आहेत.