Thu, Feb 21, 2019 11:07होमपेज › Sangli › मनपा निवडणूक दि. 19, 20 जुलै?

मनपा निवडणूक दि. 19, 20 जुलै?

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 10:59PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेची निवडणूक दि. 19 किंवा दि. 20 जुलैच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीसाठी दि. 5 जूनच्या सुमारास आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान पुढील आठवड्यात मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावरील हरकतीची सुनावणी होईल. त्यामुळे आता  राजकीय हालचालींना वेग येणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोर्चेबांधणीला वेग आला होता. महापालिका प्रशासनानेही प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजनाचे काम पूर्ण केलेआहे.

एकूण 20 प्रभागांतून 78 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदार याद्यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाणार आहे.आता नवीन मतदारांची अंतिम यादी दि. 21 मेपर्यंत महापालिकेच्या हाती येईल असा अंदाज आहे. त्यानंतर मतदार याद्यांवर हरकतीसाठी दहा दिवसाचा कालावधी जाईल. दाखल हरकतीवर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक आयोग केव्हाही निवडणुकीची घोषणा करेल, असे सांगितले जाते. मतदानापूर्वी 45 दिवस आधी आचारसंहिता लागू करण्याचे बंधन आहे. तो कालावधी लक्षात घेतला तर  दि. 19 किंवा दि. 20 जुलै रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.