Sun, Jul 21, 2019 12:02होमपेज › Sangli › सांगली महापालिकेचा आज फैसला

सांगली महापालिकेचा आज फैसला

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 03 2018 1:38AMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिका निवडणुकीसाठी 62.17 टक्के मतदान झाले आहे. आता आज, शुक्रवारी  मतमोजणी  होणार आहे. यासाठी मिरजेच्या शासकीय गोदामात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 451 उमेदवारांतून 78 नगरसेवक निवडले जाणार आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना आदींसह विविध पक्ष मैदानात आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी 4 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होईल. या निकालातून महापालिकेत सत्ता कोणाची याचा फैसला होणार आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीची ही पाचवी टर्म आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडी पहिल्यांदाच तर स्वाभिमानी विकास आघाडी दुसर्‍यांदा मैदानात उतरली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज अपक्षांनीही बंड पुकारले होते. एकूण 451 उमेदवार रिंगणात होते. सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता.

तीन शहरांत बुधवारी 544 केंद्रांवर 62.17 टक्के मतदान झाले. रात्री 3 वाजेपर्यंत निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस यंत्रणेने मिरजेच्या शासकीय गोदामात  तयार केलेल्या निवडणूक कक्षामध्ये ईव्हीएम मशिन सील करून सुरक्षित ठेवली आहेत. आता मतमोजणी आज, शुक्रवारी होणार आहे. यासाठी सर्वच सहा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची यंत्रणा सज्ज झाली आहे.  परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळी 8 वाजल्यापासून यंत्रणा मतमोजणीच्या प्रक्रियेचे कामकाज सुरू करतील. परंतु सर्व तयारी झाल्यानंतर  सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे. प्रत्येक प्रभागाची मतमोजणी तीन ते चार फेर्‍यांत  होणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, असा अंदाज आहे. 78 भावी नगरसेवक निवडले जातील. त्यातून कोणाचे किती उमेदवार विजयी होणार, यावर सत्तेचे गणित ठरणार आहे. यादृष्टीने आता सर्वच पक्ष, उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

दुपारी चार वाजेपर्यंत निकाल : रवींद्र खेबुडकर

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खेबुडकर म्हणाले, सांगली-कुपवाड व मिरजेतील प्रभागांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मतमोजणी एकूण 11 फेर्‍यांत होणार आहे. यामध्ये तिसर्‍या फेरीत प्रभाग 12, 9, 15, 1, 6, 3 या प्रभागांचे साडेअकरा वाजेपर्यंत निकाल लागतील.  पाचव्या फेरीअखेर प्रभाग 13 चा निकाल लागेल. सहाव्या फेरीअखेर 10, 17, 2, 7 व 4 या प्रभागांचे निकाल लागतील. आठव्या फेरीअखेर प्रभाग 14, 11, 18, 8 या प्रभागांचा निकाल लागेल. 19 व 5 प्रभागांचा निकाल नवव्या फेरीअखेर लागेल. प्रभाग 16 व 20 चा निकाल अकराव्या फेरीअखेर लागेल. सर्व निकाल हे अर्ध्या तासाच्या फरकाने जाहीर होतील. सर्व निकाल दुपारी 4 पर्यंंत जाहीर होतील.