Tue, Jul 23, 2019 16:47होमपेज › Sangli › भाजपमध्ये हाजीर तो वजीर : ना. पाटील

भाजपमध्ये हाजीर तो वजीर : ना. पाटील

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 12:08AMसांगली : प्रतिनिधी

प्रत्येक पक्षाला निवडणुकीत लवचिकता ठेवावी लागते. त्यानुसार हाजीर तो वजीर याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीतून शेवटच्या क्षणी तुल्यबळ कार्यकर्ते आले तर त्यांना भाजपची उमेदवारी दिली जाईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी  कोअर कमिटीची पहिलीच बैठक शुक्रवारी आमराई ऑफिसर्स क्‍लब येथे पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, अन्य पक्षांप्रमाणे चार जण बसले आणि उमेदवार ठरवले, असे भाजपमध्ये होत नाही. पक्षीय परंपरेनुसार कोअर कमिटी दि. 1 व दि. 2 जुलै रोजी 300 हून अधिक इच्छुक अर्जदारांच्या मुलाखती घेईल. यामध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याच्या तयारीची सर्व बाजू मांडण्याची मुभा आहे. त्यानुसार सांगली व कुपवाडमधील 10 प्रभागांच्या रविवारी (1 जुलै) कच्छी भवन येथे सकाळी 10 ते 6 या वेळेत आणि सोमवारी ( दि. 2) कुपवाड व मिरजेतील 10 प्रभागांतील इच्छुकांच्या मिरजेत पटवर्धन हॉल येथे मुलाखती होतील. त्यातून छाननीनुसार जेथे कोणताच वाद किंवा अडचणी होणार नाहीत अशा प्रभागांतील उमेदवारांची पहिली यादी दि. 4 जुलैला जाहीर करण्याचे प्रयत्न आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादीतून अनेकजण भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते. याबाबतच्या प्रश्नावरते म्हणाले,  त्यातील काहीजण  मुलाखतीतही सहभागी असतील. त्यांचे पक्षप्रवेश लवकरच होणार आहेत. पहिली यादी दि.4 रोजी जाहीर केल्यानंतर ऐनवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीतून  कोणी आले तर त्यांना घेणार का, याबद्दल विचारता ते म्हणाले, विनिंग मेरिट असेल तर सत्तेसाठी ते करावेच लागते.  अर्थात त्यांच्यावरच विसंबून न राहता आमची स्वतंत्र यादी निश्‍चित  तयार ठेवणारच आहोत.

केंद्र, राज्यात सोबत असणार्‍या पक्षांना महापालिका निवडणुकीसाठी सोबत घेणार का? याबद्दल विचारता ते म्हणाले, शिवसेना, मनसेचे नितीन शिंदे, रासपसह अन्य समविचारी पक्षांसोबत यासाठी चर्चा सुरूच आहे. त्यातील काहीजणांना एक-दोन जागा देऊन सोबत घेऊही. पण काहीजणांनी क्षमतेपेक्षा जास्त जागा मागितल्या आहेत. त्यामुळे निर्णय होऊ शकले नाहीत. पण काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधी सर्वांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.यावेळी कोअर कमिटीचे सदस्य शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सुरेश हाळवणकर, प्रदेशचिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, दीपक शिंदे, प्रकाश बिरजे, पप्पू ऊर्फ शिवाजी डोंगरे, राजाराम गरुड, शरद नलावडे, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

खासदार पाटील यांची बैठकीला दांडी

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तरीही भाजपअंतर्गत नाराजीतून खासदार संजय पाटील यांना डावलल्याची आणि त्यामुळे ते सक्रिय नसल्याची चर्चा आहे. आजही कोअर कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला त्यांची दांडी होती. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज  देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर हेही अनुपस्थित होते. याबद्दल विचारता चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक सदस्यांच्या वेळेनुसार बैठक होणे शक्य नसते. त्यामुळे एखाद्यावेळी मागे-पुढे होते. खासदार पाटील जतला पूर्वनियोजित सत्कार समारंभामुळे गेले आहेत. त्यांच्याशी संबंधित विषय आला तर बैठकीत चर्चा होतेच. कुणाची काही नाराजी नाही.