Tue, Mar 19, 2019 09:14होमपेज › Sangli › मनपा आयुक्‍तांची चौकशी करणार

मनपा आयुक्‍तांची चौकशी करणार

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 04 2018 12:08AMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचे आयुक्‍त रवींद्र खेबूडकर यांच्या कारभाराची चौकशी करण्यात येईल. त्यासाठी समिती नियुक्‍त करण्यात येईल, अशी माहिती  पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

महापालिकेचे आयुक्‍त महापालिकेच्या सभांना अनुपस्थित राहत आहेत. महापालिका क्षेत्रात काम चांगले नसल्याने नागरिक जिल्हाधिकार्‍यांकडे गार्‍हाणे मांडण्यासाठी येत आहेत. त्यासंदर्भात विचारले असता,  मंत्री देशमुख म्हणाले, याप्रकरणी आयुक्‍तांच्या कारभाराची  चौकशी करण्यात येईल. नेमका काय  प्रकार आहे, हे पाहिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. 

ते म्हणाले, जिल्हा परिषद ग्रामीण भागातील शाळेत गरिबांची मुले शिकतात. मात्र, अनेक वर्षांपासून निधीअभावी शाळांच्या दुरूस्तीवर खर्च झालेला नाही. त्यामुळे या शाळांची अवस्था जीर्ण झाली आहे. अनेक शाळांचे पत्रे वादळामुळे उडून गेले आहेत. त्यामुळे या शाळांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून किंवा अखर्चित निधीतून 14 कोट रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे.

भविष्यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेताना गरिबांची मुले सुरक्षित राहतील, यादृष्टीने या शाळांना  जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शासनाबरोबरच जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर असणार्‍या मूळच्या सांगली जिल्ह्यातील अधिकारी, उद्योजक, अन्य मान्यवर यांनी या शाळांना सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करावी.  

देशमुख म्हणाले, 21 जून जागतिक योग दिन आहे.  या दिवशी जत तालुक्यातील बालगाव येथे भव्य योग शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात सांगलीसह  सोलापूर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे. गिनीज् बुकात या शिबिराची नोद व्हावी, यासाठी सांगलीकरांनी प्रयत्न करावेत.