होमपेज › Sangli › आरग गुटखाप्रकरणी मुसा जमादारला अटक

आरग गुटखाप्रकरणी मुसा जमादारला अटक

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 11:15PM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी    

आरग ( ता. मिरज) येथील गुटखा कारखान्याप्रकरणी पुण्याच्या जीएसटी  विभागाने मिरजेत  मुुसा जमादार (वय 57, रा. सुंदरनगर, मिरज) त्याला सोमवारी अटक केली. पुण्याच्या वैशाली पतंगे, सुनील यादव व त्यांच्या पथकाने हा तपास पुन्हा गतीने सुरू केला आहे. मुसा याची तब्येत बिघडल्याने त्याला येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

दि. 7 फेब्रुवारीरोजी पुण्याच्या जीएसटी ( तत्कालीन केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग)च्या गुप्तचर विभागाने मिरज तालुक्यातील आरग येथे छापा टाकला होता. तेथे राज कोल्हापुरी व यात्री या दोन कंपन्यांचा गुटखा तयार केला जात होता. तेथून 10 लाखांचा तयार गुटखा आणि 5 मशीन असा सुमारे 2 कोटी रूपयांचा माल जप्त करण्यात आला होता. तो कारखाना सील करून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी 15  कर्मचारी राजस्थानी होते. त्यांचे जबाब घेऊन सोडून देण्यात आले होते. 

मिरजेतील हॉटेल व्यावसाईक फिरोज जमादार व त्याचा कर्मचारी शिशुपाल कांबळे या दोघांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता.  तो पुन्हा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर त्या दोघांना अटक करून तुरूंगात पाठविण्यात आले होते.

या प्रकरणातील संशयित मुसा व त्याचा मुलगा फारूक या दोघांनाही हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते हजरच झाले नाहीत. त्या दोघांचेही जामिनासाठीचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्यात फारूक याला  तपास अधिकारी उपसंचालक वैशाली पतंगे, अधीक्षक सुनील यादव व त्यांच्या पथकाने छापा टाकून अटक केली होती. 

आज हे पथक पुन्हा मिरजेत तपासासाठी दाखल झाले. मुसा याला चौकशीसाठी येथील कार्यालयात बोलविण्यात आले होते. तो चौकशीसाठी अधिकार्‍यांना मदत करीत नसल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याच्या छातीत दुखू लागल्याने मिरजेच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता  तो बरा होण्याची प्रतीक्षा तपास अधिकारी करीत आहेत.