Sun, Mar 24, 2019 06:12होमपेज › Sangli › माणगंगा कारखान्यावर आंदोलन; दगडफेक

माणगंगा कारखान्यावर आंदोलन; दगडफेक

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:54PMआटपाडी  ः प्रतिनिधी 

थकित ऊसबिलांसाठी बुधवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या वेळी माणगंगा साखर कारखान्यावर दगडफेक करण्यात आली. संतप्त शेतकर्‍यांनी घोषणा देत चेअरमन केबिन व अकौंट विभागावर दगड व विटा फेकल्या. काचा फोडत संताप व्यक्‍त केला. या घटनेनंतर दि. 10 फेब्रुवारीच्या आत बिले द्या; अन्यथा त्या दिवशी मोर्चा काढून पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला.

माणगंगा  कारखान्याने 2016-17 मध्ये शेतकर्‍यांनी पुरवठा केलेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. या बिलांसाठी शेतकर्‍यांनी अनेकदा हेलपाटे मारले; परंतु बिले देण्यात आली नाहीत. त्यामुळे आज कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, पलूस, खटाव, पळशी, पुसेसावळी भागांतील सुमारे 50 शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्‍ते महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी कारखान्यावर गेले.

माणगंगा  कारखान्यात  अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख आणि कार्यकारी संचालक मोटे यांची भेट झाली नाही.शेतकर्‍यांनी फोनवरुन त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु  प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी चेअरमन केबीनमध्ये ‘घामाचा दाम दिलाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. तिथेच ठिय्या दिला.

त्यानंतर शेतकर्‍यांनी  कारखाना बंद करण्यासाठी धाव घेतली. मात्र कारखाना आधीच बंद असल्याने त्यांनी प्रशासन विभागाकडे मोर्चा वळवला.कर्मचार्‍यांना कार्यालयातून बाहेर काढून कार्यालयाला कुलुप लावले. चेअरमन केबीन व अकौंट विभागावर दगडफेक करीत संताप व्यक्त केला.या दगडफेकीमुळे केबीन व कार्यालयाच्या काचा फुटल्या.

या घटनेनंतर  थकित उसबिल द्या अन्यथा  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत शेतकरी परतले.महेश खराडे, महेश जगताप, सचिन पाटील, विकास पवार, सुरज पाटील, शिवाजी पाटील, भुजंग पाटील, मानसिंग़ कदम, विठ्ठल पाटील, प्रकाश देशमुख, अर्जुन पवार, संजय देशमुख व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.