Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Sangli › मराठा आरक्षणासाठी उद्रेक

मराठा आरक्षणासाठी उद्रेक

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 10:19PMसांगली : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचा  मंगळवारी सांगली जिल्ह्यात भडका उडाला. कवठेमहांकाळ तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला.  वाळवा, तासगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. आष्टा येथे दिवसभर सारे व्यवहार ठप्प होते. इस्लामपुरात पोलिस आणि आंदोलकांत जोरदार खडाजंगी झाली.

कवठेमहांकाळमध्ये बंद; पुतळा दहन

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी शहरासह तालुक्यातील अनेक गावांतील व्यवहार बंद ठेवण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देशमुख यांची गाडी बोरगावमधील तरुणांनी अडवून घोषणाबाजी केली. कुंडलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. संतप्त मराठा समाज गावागावांत रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले.
गोदावरीच्या पात्रात आरक्षणाच्या मागणीसाठी उडी घेऊन शहीद झालेल्या काकासाहेब शिंदे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली वाहून समाजातील कार्यकर्त्यांनी शहर बंदची हाक दिली. आठवडा बाजार असूनही शहरातील व्यापार्‍यांनी प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले. पांडुरंग पाटील, नानासाहेब पाटील, दिलीप झुरे, रणजित घाडगे, तुकाराम पाटील, समाधान कदम, बाळासाहेब जगताप, सतीश पाटील यांनी शहरातून रॅली काढली. भाजपचे नेते हायुम सावणूरकर, तालुकाध्यक्ष अनिल लोंढे यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला. नायब तहसीलदार रुपाली रेडकर यांना निवेदन देण्यात आले. मिरज-पंढरपूर मार्गावरून सांगलीकडे जात असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील यांच्या गाडीचा ताफा बोरगाव फाटा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी अडविला. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. तातडीने आरक्षणाचा निर्णय जाहीर करा, अन्यथा समाजातील कोणीही भाजपच्या पाठीशी राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. संतोष पाटील, दत्ता पाटील, पोपट मुळीक, अक्षय पाटील, नितीन पाटील, नामदेव पाटील, सुजित पाटील उपस्थित होते.  कुंडलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष ऋतुराज पवार, तरुणांनी जाखापूर  येथे रॅली काढली. लांडगेवाडी, खरशिंग येथेही कडकडीत बंद ठेवण्यात आला.


पोलिस-आंदोलक आमने-सामने, खडाजंगी

इस्लामपूर : वार्ताहर

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला इस्लामपूरसह वाळवा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.  येथे वडाप वाहतूक बंद करण्यावरून पोलिस व आंदोलकांच्यात जोरदार वादावादी झाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने तणाव होता. 
मंगळवारी सकाळपासूनच इस्लामपूर व ग्रामीण भागातील सर्व दुकाने बंद ठेवून व्यावसायिकांनीही या बंदला पाठिंबा दिला.झरीनाका परिसरात दुकान बंद करण्यावरून वादावादीचा प्रकार घडला. बसस्थानक परिसरातील वडाप व रिक्षा वाहतूक आंदोलकांनी बंद केली. यावेळी रिक्षाचालक व मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  कार्यकर्ते व पोलिसांतही वादावादी झाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.  
बंदमुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प होते. प्रमुख बाजारपेठांतून शुकशुकाट दिसत होता. पुणे-बंगळूर महामार्गावरही तुरळक प्रमाणात वाहतूक दिसत होती. बंदमधून एस.टी. सेवा वगळल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय झाली नाही. एस.टी. च्या सर्व फेर्‍या सुरळीत सुरू होत्या. येडेनिपाणी, येलूर परिसरातही बंद पाळण्यात आला. 
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तहसीलदार व पोलिसांना  मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिग्विजय पाटील, सागर जाधव, विजय महाडिक, महेश भोसले, उमेश कुरळपकर, बाबासाहेब पाटील, डॉ. प्रताप पाटील, अ‍ॅड. जगदीश पाटील, दिग्विजय मोहिते, खंडेराव जाधव, इंद्रजित पवार, डॉ. अमितकुमार सूर्यवंशी आदींसह कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले. दरम्यान,  सुरूल, पेठ ग्रामस्थांनी 100 टक्के गाव बंद ठेवले होते.


विटा शहरात उत्स्फूर्त बंद

विटा : प्रतिनिधी

आक्रमक झालेल्या मराठा समाज बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला. आज  मंगळवारी सकाळी हजारो तरुणांनी विटा शहरातून मोटार सायकलने रॅली काढून विटा बंद केले. तसेच या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यास प्रतिसाद देत विटेकर व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेऊन मराठा समाजाला पाठिंबा दर्शवला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्राणत्याग करणार्‍या काकासाहेब शिंदे पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली. नगरसेवक अमोल बाबर,  शंकर मोहिते,  माजी नगराध्यक्ष वैभव पाटील  यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी व्यापार्‍यांना शहर बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. सुनील पाटील, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे विजय पाटील, शंकर मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.  माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नगरसेवक अमोल बाबर, शिवाजी शिंदे, केमिस्ट असोसिएशनचे विजय पाटील, डायमंड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शंकर मोहिते, महेश बाबर,अमित भोसले, विजय सपकाळ, नगरसेवक रवींद्र कदम, दहावीर शितोळे, विकास जाधव, पांडुरंग पवार, समीर कदम यांच्यासह सराफ असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी,  समाज बांधव उपस्थित होते.