होमपेज › Sangli › बाबर टोळीवर ‘मोक्‍का’साठी हालचाली 

बाबर टोळीवर ‘मोक्‍का’साठी हालचाली 

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:38PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरात गेल्या काही महिन्यांत शांत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. गुंड छोट्या बाबरची टोळी पुन्हा सक्रिय झाली असून गेल्या आठवड्यात त्याच्यासह टोळीने दोघांवर खुनी हल्ले केले. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्या मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी पुन्हा मोक्‍का कायद्याचे हत्यार उपसले आहे. त्यासाठी बाबर टोळीला मोक्का लावण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.  

छोट्या बाबर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अ‍ॅक्ट, जीवे मारण्याची धमकी देण्यासह अन्य अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.आठ महिन्यांपूर्वी त्याने एकावर खुनी हल्ला करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याशिवाय तत्कालीन पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी त्याला जिल्ह्यातून तडीपारही केले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून त्याच्या टोळीच्या कारवाया वाढल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी सावंत प्लॉट परिसरात टोळीयुद्धातूनच एकाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी नगरसेवक सचिन सावंत यांना अटक करण्यात आली आहे. 

दाद्या सावंतच्या मृत्यूनंतर सावंत टोळी शांत झाली होती. मात्र आता या टोळीनेही डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. त्या खूनप्रकरणी सचिन सावंत यांना अटकही करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र ही टोळीही शांत असल्याचे दिसत आहे. 

मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून शांत असलेल्या बाबर टोळीने पुन्हा डोके वर काढले आहे. या टोळीकडून शहरात गुन्हेगारी कारवाया वाढत असल्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी छोट्या बाबरसह त्याचे दोन्ही पुतणे आणि इतर साथीदारांना अटक करण्यात आली आहे. 

सध्या या टोळीतील सर्व संशयित पोलिस कोठडीत आहेत. शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मोक्क्याच्या कारवाईसाठी हालचाली सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.