Tue, Apr 23, 2019 01:43होमपेज › Sangli › टाकळी, बोलवाड रस्त्यावर समस्यांचा डोंगर

टाकळी, बोलवाड रस्त्यावर समस्यांचा डोंगर

Published On: May 29 2018 1:32AM | Last Updated: May 28 2018 7:45PMमिरज : जालिंदर हुलवान

प्रभाग क्रमांक पाचमध्ये पूर्वीच्या  प्रभाग क्रमांक 27, 28, 29 या तीन प्रभागांमधील भाग येतो. अन्य प्रभागांप्रमाणे याही प्रभागात समस्यांचा डोंगर आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा या भागातील नागरिकांचा आरोप आहे.  या प्रभागातील काही भागात ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रभागातीलच बोलवाड रोड, सहारा कॉलनी, वेताळनगरचा दक्षिण भाग येथे अद्याप ड्रेनेज करण्यात आलेले नाही. जेथे ड्रेनेज करण्यात आलेले आहे. ते ड्रेनेज जोडण्यासाठी पंपहाऊस बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी ड्रेनेज तयार असूनही ते जोडण्यात आलेले नाहीत. शिवाय काही ठिकाणचे ड्रेनेज पाईप बोलवाड रस्त्यावरील ओघळीत सोडण्यात आली आहे. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरून  नजीकच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. या प्रभागातील हा सर्वात महत्वाचा प्रश्‍न ठरतो आहे. याचबरोबर या प्रभागात एकही उद्यान आणि क्रीडांगण नाही. शिवाय कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. विजेचा खेळखंडोबा नेहमीचाच आहे. चाँद कॉलनीमध्ये काही ठिकाणी उघडे चेंबर आहेत. त्या नागरिकांनी झाकल्या आहेत.

वेताळनगर येथे पाण्याची चावी आहे. मात्र या चावीलगतच  सांडपाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याच भागात रस्ते करण्यात आले नाहीत. पाण्याचाही प्रश्‍न भेडसावत आहे. या प्रभागात वैरण बाजाराचा भाग येतो. वैरण बाजाराची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर तेथे मोठ्या प्रमाणात हाल होतात. प्रभागात औषध फवारणी केली जात नाही. कचरा उठावासाठी घंटागाडी तर गेल्या आठवड्यात येऊ लागली आहे. हे चित्र कधी बदलणार, असा सवाल नागरिक करू लागले आहेत.

समस्या प्रभागाच्या 5

लोकसंख्या : 25 हजार 883

परिसर : बोलवाड रोड, रेवणी गल्ली, टाकळी रोडी, वखारभाग, मच्छी मार्केट, नदीवेस, मिरज मार्केट ते शास्त्री चौक, पिरजादे प्लॉट, चांद कॉलनी, जवाहर हायस्कूल, बौद्ध वसाहत, कृष्णाघाटचा उत्तरेकडील भाग.