Sun, Aug 25, 2019 23:51होमपेज › Sangli › कवठेमहांकाळ तालुक्यात बहुसंख्य तलाव कोरडे

कवठेमहांकाळ तालुक्यात बहुसंख्य तलाव कोरडे

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 12:27AMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

म्हैसाळ योजना केवळ नावाला सुरू असून, ती वारंवार बंद पडत असल्यामुळे तालुक्यात टंचाई अधिक तीव्र झाली आहे. तालुक्यातील 11 पैकी बहुसंख्य तलाव कोरडे पडले आहेत. केवळ टेंभूच्या पाण्यामुळे तीन तलावात साठा दिसतो आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांना टेंभू योजनेमुळे दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी काही गावांतून टँकरची मागणी होत आहे; मात्र टँकरमुक्तीच्या शासनस्तरावरच्या बडग्यामुळे टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत.

तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून टंचाई भासू लागली आहे. शेतीच्या पाण्याची अवस्था कठीण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचीही भीषणता जाणवू लागली. पूर्व भागातील काही गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळाल्यामुळे टंचाई कमी झाली. दुधेभावी, घोरपडी, लंगरपेठ तलावामध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे त्या परिसरातील गावांना फायदा झाला. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाली.

मोठ्या राजकीय वादानंतर म्हैसाळ योजना सुरू झाली. त्यानंतर टंचाई कमी होईल, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र योजना सुरू नसल्याचे चित्र दिसते आहे. तालुक्यातील 33 ते 35 गावांची पिण्याच्या पाण्याची सोय या योजनेतून होते. गेल्या पंधरवड्यात सलगपणे तीन दिवसही कालव्यातून पाणी वाहताना दिसलेले नाही. अधिकारी केवळ पाणीपट्टी भरा, असा तगादा लावत आहेत. त्यामुळे म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

तालुक्यातील 11 पैकी 6 कोरडे आहेत. त्यापैकी नांगोळे, बसप्पाचीवाडी, बंडगरवाडी, लांडगेवाडी या चार तलावांमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी सोडता येते. काळव्यामध्येच पाणी नसल्यामुळे आता तलाव कसे भरणार हा प्रश्न आहे. दुसरीकडे  काही गावांतून टंचाईमुळे  टँकरची मागणी केली जात आहे; मात्र  शासन स्तरावरून टँकर मुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी व्हावे यासाठी टँकर देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार  लोक करू लागले आहेत. तालुक्यातील रांजणी, जाखापूर या गावांत टँकरची मागणी होत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्या वस्तीवर टंचाई जाणवत आहे.

 

Tags : sangli, sangli news, Kavathe Mahankal, pond, water,