होमपेज › Sangli › राज्य बँक, दालमिया शुगरवर फौजदारी दावा

राज्य बँक, दालमिया शुगरवर फौजदारी दावा

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 27 2018 12:38AMसांगली : प्रतिनिधी

निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याकडील कर्जास जिल्हा बँकेला तारण असलेली स्थावर व जंगम मालमत्ता राज्य सहकारी बँकेने दालमिया भारत शुगर यांना विक्री केल्याप्रकरणी जिल्हा बँकेने राज्य सहकारी बँक व दालमिया शुगर यांच्या विरोधात संगनमताने फसवणूक केल्याचा दावा शिराळा येथील न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केला आहे. 

जिल्हा बँकेने सन 2002 मध्ये निनाईदेवी कारखान्याला दुरुस्ती व मशिनरी खरेदीसाठी 8 कोटी 70 लाख रुपयांचे मध्यम मुदत कर्ज दिले होते. या कर्जास कारखान्याने करुंगुली व आरळा येथील अनुक्रमे 5.89 हेक्टर व 9.75 हेक्टर ही जमीन तसेच कारखान्याची मशिनरी (1.50 कोटी) 5 मार्च 2004 मध्ये जिल्हा बॅँकेस तारण गहाण खताने तारण दिली होती.  कर्जाची मुद्दल 8.70 कोटी, त्यावरील व्याज  अशी एकूण 28 कोटी रुपये निनाईदेवी कारखान्याकडे जिल्हा बँकेची येणेबाकी आहे. 

जिल्हा बँकेतून सांगण्यात आले की, राज्य  बँकेने सहभाग योजनेतून निनाईदेवी कारखान्यासाठी कर्ज दिले होते. सांगली जिल्हा बँकेला तारण दिलेल्या मिळकती वगळून अन्य मिळकती राज्य बँकेला तारण होत्या. राज्य  बँकेने सहभाग योजनेतील थकित कर्जाच्या वसुलीसाठी सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट 2002 या कायद्याखाली कारवाई करून कारखाना विक्रीस काढला. 

राज्य बँकेने दालमिया शुगर यांना या कारखान्याची विक्री केली. त्यावेळी राज्य बँकेने जे सेल सर्टिफिकेट दिले त्यात त्यांना तारण असलेल्या मिळकतींबरोबरच जिल्हा बँकेस तारण असलेल्या मिळकतींचाही समावेश केला. दायमिया यांना या संपूर्ण मिळकतींचा ताबा दिला. राज्य बँक व दालमिया शुगर यांनी संगनमताने जिल्हा बँकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिराळा कोर्टात फौजदारी दावा दाखल केला आहे.    

थकित कर्ज वसुलीस प्रारंभ; ‘टॉप 20’ संस्था अजेंड्यांवर

राज्य बँक व दालमिया शुगर विरोधात दावा दाखल करून जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसंदर्भातही पवित्रा स्पष्ट केल्याचे संकेत मिळत आहेत. थकबाकी वसुलीसाठी मार्च 2019 ची वाट न पाहता ‘टॉप-20’ थकबाकीदार संस्थांकडील वसुलीसाठी आत्तापासूनच मोहीम सुरू होईल, असे दिसत आहे. 
 

Tags : sangli, sangli news, Mortgage Property to District Bank , Interactive Sales Case,