Thu, Apr 25, 2019 03:57होमपेज › Sangli › अनिल बाबर यांची कामापेक्षा प्रसिद्धीच जास्त

अनिल बाबर यांची कामापेक्षा प्रसिद्धीच जास्त

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:33PMविटा : वार्ताहर  

खासदार झाल्यानंतर  आतापर्यंत  कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या आपण अनेक बैठक घेतल्या. पण त्याचा फोटो काढून कधी प्रसिद्धी मिळवली नाही. परंतु या भागाचे आमदार अनिलराव बाबर यांनी मात्र कामापेक्षा प्रसिध्दीच जादा करीत आहेत, असा आरोप कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील केला.  कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार संजय पाटील यांचा विटा पालिकेत सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, पंचायत समिती सदस्य संजय मोहिते,  सुहास पुदाले उपस्थित होते. 

ते म्हणाले,अलिकडच्या काळात सोशल मीडिया आणि मीडिया लोकांच्यापर्यंत पोहचण्याचे काम प्रभावीपणे करत आहेत.  खासदार झाल्यानंतर  कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अनेक  बैठका घेतल्या. पण त्याचा फोटो काढून कधी प्रसिद्धी मिळवली नाही. काही माणसं मात्र हे काम अतिशय जोमाने करत आहेत, अशी टीका आमदार बाबर यांचे नाव न घेता केली.  टेंभूच्या बाबतीत दिल्लीला अडीच महिन्यात तीन - चार बैठका झाल्या. टेंभूला 1283 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन त्याचा समावेश बळीराजा संजीवनी योजनेत करणार आहे. येत्या दीड वर्षात टेंभू पूर्ण करणार आहे.  

सदाशिवराव पाटील म्हणाले, खानापूर घाटमाथ्यावर  पाणी गेले पाहिजे. या भागातील लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या योजनेसाठी 1995 पासून सर्वांनी प्रयत्न केले आहेत. परंतु काही लोकांना जे होतंय ते माझ्यामुळेच, असे वाटते,  अशी टीका   त्यांनी केली.माजी नगराध्यक्ष वैभव  पाटील   यांचे भाषण झाले. नगरसेवक किरण तारळेकर, अनिल म. बाबर, सचिन शितोळे, दत्तात्रय चोथे, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, धर्मेश पाटील, रवींद्र कदम, किशोर डोंबे, महेश कदम, प्रताप सुतार, सागर लकडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विकास जाधव, अमित भोसले, ब्रम्हदेव बाबर, गजानन निकम, सुभाष भिंगारदेवे उपस्थित होते.