Tue, May 21, 2019 05:02होमपेज › Sangli › ‘चांदोली’त गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस 

‘चांदोली’त गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस 

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:30PMवारणावती : आष्पाक आत्तार 

चांदोली परिसरात पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक आहे . यंदा जवळपास  409 मिलीमीटर पाऊस अधिक बरसला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 1410 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा आजअखेर 1819 मिलीमीटर पाऊस पडला आहे. चांदोली धरणातही मुबलक पाणीसाठा झाला आहे, त्यामुळे पुढील वर्षभराचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

चांदोलीत पावसाचे प्रमाण 3000 ते 5000 मिलीमीटर इतके आहे. आजपर्यंत सन  2005 मध्ये सर्वाधिक 4528 मिलीमीटर इतक्या पावसाची येथे नोंद झाली आहे. तर सन 2000 मध्ये  सर्वात कमी 1825 मिलीमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. यंदा जूनच्या सुरुवातीलाच पावसाने सुरुवात केली. दोन, तीन दिवस रिमझिम असलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला. सलग दोन दिवस अतिवृष्टी झाली, त्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढली. अगोदरच गतवर्षीच्या तुलनेत यंदा 5 टीएमसी पाणी धरणात अधिक शिल्लक होते. त्यात वाढलेला पाऊस आणि पुन्हा सलग सहा दिवस झालेली अतिवृष्टी यामुळे यंदा दीड महिना आधीच धरणातील पाण्याने सांडवा पातळी ओलांडली. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडून 18 हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करावा लागला होता.

पावसाचा जोर ओसरल्याने दिलासा...

गतवर्षीच्या तुलनेत यंदा  409 मिलीमीटर पाऊस अधिक बरसला. गतवर्षी आजच्या तारखेला 1410 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा आजअखेर 1819 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी धरणात 26.55 टीएमसी पाणीसाठा होता, तर यंदा 28.90 टीएमसी पाणीसाठा आहे . धरणात 8339 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे तर वीज कालवा व मुख्य दरवाजातून 7 हजार 431 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे . पावसाचा जोर कमी झाला आहे. शिवाय धरणातील विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पात्राबाहेर गेलेली वारणा नदी पात्रातून वाहू लागली आहे पाण्याखाली गेलेले पूल मोकळे होऊन वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. सलग सहा दिवस ऊस व भात पिके पाण्याखाली राहिल्यामुळे काही ठिकाणची पिके कुजली आहेत, त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.