Thu, Aug 22, 2019 08:49होमपेज › Sangli › ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ जिल्हा परिषद राबविणार : अभिजीत राऊत

‘मासिक पाळी व्यवस्थापन’ जिल्हा परिषद राबविणार : अभिजीत राऊत

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:03PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मासिक पाळी व्यवस्थापनाचा विषय जिल्ह्यातील 85 हजार विद्यार्थींनीपर्यंत पोहचवू, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी केले. टी. बी. लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा परिषद व महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, मुलींना मासिक पाळीविषयी माहिती दिली जात नाही. त्यामुळे त्यांना अनेक संसर्गजन्य आजारांना तोंड द्यावे लागते. लुल्ला ट्रस्टने मासिक पाळीविषयी कार्यशाळा घेऊन प्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्रात प्रथमच असा उपक्रम होत आहे. यापुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 85 हजार विद्यार्थींना मासिक पाळीविषयी माहिती पोहचविली जाईल, असे ते म्हणाले. 

रोशनी संस्थेचे कौस्तुभ जोगळेकर, प्रविण निकम यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. मासिक पाळीविषयी मुलींशी संवाद कसा साधायचा हे उदाहरणासह सांगितले. मासिक पाळीवेळी काही मुली रडतात, काही घाबरतात, काहींना कॅन्सर झाल्याचा संशय येतो. हे सर्व गैरसमज दूर करून त्यांना बोलते केले पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये सॅनेटरी पॅड ठेवले पाहिजे. दुसरे सत्र पालकांसाठी झाले. राजीव तांबे यांनी माहिती दिली.  मासिक पाळीविषयी मुलींना कसे समावून सांगायचे, याबाबत माहिती दिली. 

यशस्विनी तुपकरी यांनी मासिक पाळीविषयी पथनाट्य सादर केले. यामध्ये शरीरात होणारे बदल, मुलाचा जन्म, लैंगिकता याची माहिती दिली. तसेच पुरुषांपासून सावध राहणे, स्पर्श ओळखणे आदिबाबत मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात धनंजय वाघ यांनी फेसबूकच्या माध्यमातून  लाईव्ह ब्रॉडकास्टद्वारे 93 शाळांशी संवाद साधला. 

लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टचे अ‍ॅड. किशोर लुल्ला यांनी प्रास्ताविक केले. मयुरेश अभ्यंकर, विनीता तेलंग, वर्षा लिमये यांनी सूत्रसंचालन केले. मीनाक्षी कोळी, नरेंद्र यरगट्टीकर, आशितोष अभ्यंकर यांनी संयोजन केले. यावेळी अमित लुल्ला, डायटचे सलगर, जिल्हा परिषदेच्या दीपाली पाटील, रुपाली सुरनीस, मुग्धा अभ्यंकर आदी उपस्थित होते.