Tue, Mar 19, 2019 15:50होमपेज › Sangli › सांगलीत पावसाने रस्त्यांवर तळे

सांगलीत पावसाने रस्त्यांवर तळे

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 11:57PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत बुधवारी पुन्हा गारांसह पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी अर्धा तास झालेल्या पावसाने शहरातील सर्वच रस्त्यांवर, चौका-चौकात, मध्यवर्ती बसस्थानकात पाण्याचे तळे साठले होते. शहरातील बिघडलेल्या ड्रेनेज यंत्रणेनेमुळेही बॅक वॉटरसह सांडपाणी भाजीमंडई, झुलेलाल चौकासह अनेक ठिकाणी पसरले. काही ठिकाणी तर  सांडपाणी घरांमध्येही शिरले होते. यातून वाट काढण्यासाठी नागरिकांची तारेवरची कसरत सुरू होती.

सांगली, मिरज आणि कुपवाड परिसराला दुपारी गारांसह पावसाने धुतले. अर्धा तास झालेल्या पावसाने नेहमीप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापनाचा  बोजवारा उडाला.स्टेशन चौक,राजवाडा चौक, राजवाडा परिसर, दत्त-मारुती चौक रस्ता, झुलेलाल चौक, राममंदिर कॉर्नर, काँग्रेस कमिटी चौक, सिव्हिल-चारमंदिर रस्ता, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात यामुळे पाणी साठले. शिवाजी मंडई परिसरात हे सांडपाणी शिरल्याने भाजी विक्रेत्यांची दैना उडाली.  या  तळ्यातून वाहनांची कासवगतीने वाटचाल सुरू होती. 

गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बसस्थानक परिसर, मारुती रस्ता, शाहू उद्यान परिसरात ड्रेनेज यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी विद्युत मोटारी लावून सांडपाणी उचलून टाकण्याची वेळ आली आहे. त्यातच पावसाने परिसरात सांडपाणी साचून भर पडली आहे. यामुळे  सांडपाणी परिसरात पसरून गटारगंगा तयार झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांना  रस्त्यावर वावरणे मुश्किल झाले.  बसस्थानकातही जागोजागी तळे साचल्याने प्रवाशांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागली.  उपनगरांमध्येही राडेराड झाली होती.

तासगावमध्ये गारपीट; कवठेमहांकाळमध्ये तुरळक

तासगाव शहरासह तालुक्यात काही ठिकाणी बुधवारी दुपारी जोरदार वार्‍यासह गारपीट झाली. पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्याने विद्युतपुवरठा खंडित झाला, वाहतूक खोळंबली. दरम्यान या पावसामुळे येळावीसह आसपासच्या भागात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, बोरगाव, मळणगाव परिसरात तर सायंकाळी कवठेमहांकाळ, नांगोळे, रांजणी परिसरात पाऊस झाला.