सांगली : प्रतिनिधी
पठाणी वसुली करणार्या सावकारांविरोधात पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्याच प्लॅनचा पहिला दणका अधीक्षक शर्मा यांनी मंगळवारी रात्री दिला आहे. सावकारी करणार्या दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता जिल्ह्यातही सावकारांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्याचे संकेत यातून शर्मा यांनी दिले आहेत.
विशाल विलास कुडचे, गणेश अनिल वायदंडे (दोघेही रा. विश्रामबाग) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्निल प्रकाश गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी) याने फिर्याद दिली आहे. गळतगे यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने गळतगे याने सांगलीतील एका बँकेत कर्जासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी बँकेतील एका कर्मचार्याने विशाल कुडचे यांच्याकडून दरमहा सात टक्के व्याजाने तातडीने पैसे मिळतील, असे सांगितले.
त्यावेळी गळतगे याला पैशांची गरज असल्याने त्याने कुडचे याच्याकडून 4 लाख रूपये घेतले. त्यावेळी कुडचे याने त्याच्याकडून दोन कोरे धनादेश, शंभर रूपयांचा एक मुद्रांक सही करून घेतला. तसेच चार महिन्यांचे व्याज एक लाख आठ हजार रूपये कापून घेतले. व्याज कापून राहिलेली रक्कम गळतगे याच्या बँक खात्यावर भरली. त्यावेळी दर आठवड्याला वीस हजार रुपयांचा हप्ता देण्याची अट कुडचे याने घातली होती.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने गळतगे याने त्याला 4 लाख 38 हजारांची रक्कम दिली होती. तरीही अजून 3 लाख 95 हजार रूपये बाकी असल्याचे सांगत कुडचे याने गळतगेसह त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
गणेश वायदंडे आणि कुडचे याने गळतगे कुटुंबीयांना वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळतगे याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याशिवाय पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडेही तक्रार दिली होती. त्याची दखल घेत कुडचे व वायदंडे यांच्याविरोधात खासगी सावकारी अधिनियम 1946 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.