Sun, Aug 25, 2019 13:04होमपेज › Sangli › सराफाला साडेसात लाखांना गंडा

सराफाला साडेसात लाखांना गंडा

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 07 2018 12:05AMसांगली : प्रतिनिधी

कुडची (कर्नाटक) येथील सराफाला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून 7 लाख 60 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. अमित अजमुद्दीन देसाई (वय 48, रा. कुडची, मूळ रा. लेंगरे, ता. खानापूर) असे सराफाचे नाव आहे. वाषाण (ता. जत) येथे बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजित पवार व अनोळखी नऊ जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

देसाई मूळचे खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील आहेत. त्यांचे कुडची येथे सराफी दुकान आहे. काही दिवसांपूर्वी पवार व त्याचे दोन साथीदार देसाई यांच्या दुकानात गेले होते. त्यावेळी त्यांनी देसाई यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्यात व्यवहार ठरल्यावर देसाई यांना जत तालुक्यातील वाषाण येथे सोने घेण्यासाठी बोलवण्यात आले. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास जत-डफळापूर रस्त्यावरील वाषाण येथे आल्यानंतर तीनही संशयित देसाई यांच्याजवळ गेले. त्यांनी पैसे आणले आहेत का, अशी विचारणा केली. देसाई यांनी सात लाख साठ हजारांची रोकड दाखवली.त्यानंतर अचानक आजू-बाजूला लपलेले सहा ते सातजण तेथे आले. त्यांनी देसाई यांना बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग काढून घेतली. त्यानंतर ते तेथून निघून गेले. या घटनेनंतर शुक्रवारी देसाई यांनी जत पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार जत पोलिस ठाण्यात दहाजणांविरोधात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.