Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Sangli › अल्पवयीन मुलीचा विनयभंग: तिघांना सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग: तिघांना सक्तमजुरी

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 11:23PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

मसुचीवाडी ( ता. वाळवा) येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना  दीड वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा न्यायाधीश के. एस. होरे यांनी सुनावली. प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडही करण्यात आला.

इंद्रजित उर्फ रोहित प्रकाश खोत (वय 23), संग्राम उर्फ सागर प्रकाश खोत (वय 26), अमोलसिद्ध उर्फ आप्पासाहेब नरसाप्पा बबलेश्‍वर (वय 24, सर्व रा. अण्णाप्पा मळा, मसुचीवाडी रोड, बोरगाव) अशी  आरोपींची नावे आहेत.  विनयभंगाचा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला होता.

पीडित मुलगी इस्लामपूर येथे शिक्षण घेत होती. महाविद्यालयातून गावाकडे परत येत असता  संशयित आरोपी रोहित, सागर, आप्पासाहेब व राजेंद्र पवार हे चौघेजण मोटारसायकलवरून आले. त्यांनी पीडित मुलीच्या आडवी मोटारसायकल लावून तिला थांबविले. विनयभंग केला. आमच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिलीस तर तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेतो, अशी धमकीही चौघांनी दिली होती. पीडित मुलगी ज्या एस. टी. बसमध्ये बसेल त्या बसचा  आरोपी मोटारसायकलवरून पाठलाग करत असत.  

दि.1 मे 2016 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घराच्या बाहेर थांबली असताना रोहित, सागर, आप्पासाहेब व राजेंद्र पवार हे मोटार सायकलवरून  आले. तिला मोटारसायकलवर बसण्यासाठी धमकावू लागले. सततच्या त्रासाला कंटाळून  तिने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. चौथा संशयित  राजेंद्र पवार हा अद्याप फरारी आहे. 

पोलिसांनी या तिघांविरोधात विनयभंग, बाललैंगिक अत्याचारप्रकरणी येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून दीड वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 

सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी काम पाहिले. पोलिस संजय पवार, चंद्रकांत शितोळे यांनी तपासकामी मदत केली.