सांगली : प्रतिनिधी
अंकली (ता. मिरज) येथून 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवरून पळवून नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दोघांना तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. रामचंद्र संताजी कसबे (वय 20), दादासाहेब आनंदा ओव्हाळ (वय 20, दोघेही रा. खरसोळी, ता. पंढरपूर) अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. व्ही. ए. दीक्षित यांनी ही शिक्षा सुनावली.
दि. 5 ऑक्टोबर 2015 रोजी पीडित मुलगी आजोबांसमवेत पंढरपूरहून मिरजेला रेल्वेने येत होती. दोन्ही आरोपींनी तिचा पाठलाग करून तिला मोबाईल देण्याचा प्रयत्न केला. रामचंद्र कसबे पीडित मुलीला पळून जाऊन लग्न करू, असे वारंवार म्हणत होता. त्यानंतर चार दिवसांनी पीडित मुलगी अंकली (ता. मिरज) येथे दवाखान्यात जात असताना दोघेही मोटारसायकलवरून तिथे गेले.
दोघांनीही तिला गाडीवरून पळवून नेले. त्यानंतर तिच्यासोबत रामचंद्रने अश्लील वर्तनही केले. यामध्ये दादासाहेबने त्याला मदत केली. याप्रकरणी दोघांवरही मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अपहरण, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर न्या. दीक्षित यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. रियाज जमादार यांनी काम पाहिले.
या खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, पंच, तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यांच्या आधारे दोघांनाही तीन वर्षांचा सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.