Thu, Jun 27, 2019 17:45होमपेज › Sangli › वॉटर कप स्पर्धेत मोकाशेवाडीची बाजी

वॉटर कप स्पर्धेत मोकाशेवाडीची बाजी

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 11:35PMयेळवी : वार्ताहर 

सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत जत  तालुकास्तरावर     मोकाशेवाडीचा प्रथम क्रमांक आला आहे.  द्वितीय  बागलवाडीचा तर कुलाळवाडीचा तिसरा क्रमांक आला आहे. बक्षीस  वितरण  सोहळा पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  पार पाडला.

दुष्काळी जत तालुक्यात सर्वाधिक  म्हणजे 106 गावांनी सहभाग  घेतला होता. श्रमदानातून व यंत्राद्वारे पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेस वाव देत  पाण्यासाठी लोकचळवळ निर्माण केली होती. सलग 45  दिवस उस्फूर्तपणे काम चालले होते. यात उस्फूर्तपणे गावकर्‍यांनी लोकसहभाग  नोंदविला होता. बालचमू ते 75 गाठलेल्या वृद्धांनी देखील श्रमदानात सहभाग  घेतला होता. आघाडीवर असलेल्या गावनिहाय झालेल्या कामाचे  मूल्यमापन पाणी फौंडेशनच्या कमिटीने केले होते .

रोपवाटिका, शोषखड्डे, शेततळी, समतल चर, मातीनाला बांध, ओढापत्रातील गाळ काढणे, नाला खोलीकरण व सरळीकरणची कामे हाती घेण्यात  आली होती. मोकाशेवाडी या गावास पाणी फौंडेशन ने दहा लाखाचे बक्षीस व मुख्यमंत्री  फडणवीस यांनी घोषित केलेले पाच लाख मिळणार आहेत. गतवर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या बागलवाडी या गावास  द्वितीय क्रमांकावर  समाधान मानावे लागले. तर कुलाळवाडी या गावास तृतीय क्रमांक मिळाला. या कामाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवंढी व दुसरा क्रमांक आलेल्या बागलवाडी गावात पाणी फौडेशनच्या कामाची पाहणी करुन कौतुक  केले  होते. याचबरोबर आंवढी, देवनाळ, मायथळ या गावातील पाणी फौंडेशन च्या माध्यमातून  जलसंधारणाची कामे चांगली झाली आहेत.मोकाशेवाडी (ता.जत)  सर्वांनी  एकत्रित येऊन  चांगले काम केले.त्यामुळे गावास प्रथम क्रमांक मिळाला आहे,  अशी माहिती सरपंच अण्णासाहेब गायकवाड यांनी दिली.