होमपेज › Sangli › मिरज पूर्वभागात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

मिरज पूर्वभागात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Jun 20 2018 1:39AM | Last Updated: Jun 19 2018 8:40PMलिंगनूर : प्रवीण जगताप 

मिरज तालुक्याच्या पूर्व भागात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडा बाजारातील लोक आणि बस, रेल्वे स्थानकावरील गडबडीत असणारे प्रवासी यांना टार्गेट केले जात आहे. चोरटे सापडत नसल्याने ग्रामस्थ व पोलिसही निराश झाले आहेत. 

पूर्व भागात सध्या भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढू लागले आहे. आरग, बेडग, सलगरे, कवठेमहांकाळ आणि कर्नाटकातील अथणी या ठिकाणी येणार्‍या - जाणार्‍यांवर मोबाईल चोरट्यांचा डोळा आहे. येथे गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांचा उच्छाद वाढला आहे. 

सलगरेतील सोमवारचा आठवडा बाजार परिसरातील गावांना मध्यवर्ती आहे. येथे सलगरे, कोंगनोळी, सराटी, बेळंकी, जानराववाडी आणि कर्नाटकातील अळट्टी, जकराटी, पांडेगाव, खिळेगाव, शिरूर या गावांतील ग्रामस्थ, व्यापारी आणि विक्रेते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. त्यामुळे बाजारात दिवसभर प्रचंड गर्दी असते. या गर्दीचाच फायदा घेत मोबाईलची चोरी  होते.  

सलगरे येथून कर्नाटक सीमा जवळ आहे. तसेच रेल्वे, वडाप यांच्या सोयी आहेत. त्यामुळे चोरट्यांनाही कमी खर्चात सलगरेस ये-जा करण्याची सोय आहे. विशेषत: रेल्वेने फुकटात येऊन चोरी करून पसार होता येते. त्यामुळे सलगरेतील मोबाईल चोर्‍या वाढल्या आहेत.

सात ते पंधरा हजार रुपये किंमतीच्या मोबाईलचीच चोरी अधिक होते असा अनुभव येतो आहे. मोबाईलची चोरी झाल्यानंतर त्याची पोलिसात तक्रार करणे, त्यांचे ट्रॅकिंग करणे, पोलिस खात्याकडे पाठपुरावा सहा महिन्यापर्यंत सुरू ठेवणे हे ग्रामस्थांना शक्य होत नाही. शिवाय इतका त्रास घेऊन तो मोबाईल परत मिळण्याची शक्यताही  नसते. शिवाय  मोबाईल चोरीनंतर ते लगेच स्वीच ऑफ केले जातात. त्यातील सीमकार्डही बदलले जाते. पाठपुरावा केला तरच  पोलिस  अशा अनेक गुन्ह्यांचा कसून तपास करतात, अन्यथा त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा अनुभव आहे.

तीस हजार ते एक लाख रुपये किंमतीचे मोबाईल मात्र चोरीस गेल्यानंतर मालकाच्या पाठपुराव्यामुळे ते ट्रॅक केले जातात. पण असे मोबाईल काही काळाने खूप दूर अंतरावर ट्रॅक झाल्यास त्याचा शोध घेऊन ते मिळविणे व चोरट्यास पकडणे अवघड जाते. पण मोबाईल जवळच्या परिसरातच असेल तर मात्र आयएमआयईद्वारे परत मिळाल्याची उदाहरणे आहेत. पण तोपर्यंत तो मोबाईल वापरून खराब झालेला असतो. 

तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी 

मोबाईलचा वापर आता प्रचंड वाढला आहे. मोबाईल चोर्‍या वाढल्यामुळे सायबर क्राईमप्रमाणे यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र यंत्रणा व अधिकार्‍यांकडे कार्यभार देण्याची गरज आहे. त्यामुळे चोर्‍या काही प्रमाणात सापडतील.