Tue, Jul 23, 2019 10:42होमपेज › Sangli › मोबाईल कंपन्यांच्या चरखोदाईत घोटाळा

मोबाईल कंपन्यांच्या चरखोदाईत घोटाळा

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 10:51PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरात मोबाईल कंपन्यांच्या केबल्ससाठी रस्ते खोदाईत लाखोंचा घोटाळा झाला आहे. प्रत्यक्षात प्रशासनाने मंजुरी दिली त्यापेक्षा कित्येकपट जादा रस्ते खोदाई झाल्याचा आरोप नगरसेवकांनी गुरुवारी स्थायी समिती सभेत केला. याप्रकरणी सध्या सुरू असलेली कामे बंद ठेवून त्याची चौकशी करावी आणि अहवाल द्यावा, असे आदेश सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी दिले. 

सातपुते म्हणाले, शहरात रिलायन्स कंपनीने केबल टाकण्यासाठी चरखोदाई सुरू केली आहे. यासाठी स्थायी समितीची परवानगी घेतली नाही. प्रशासनाने तीन कोटी रूपये कंपनीकडून भरून घेऊन 9 किलोमीटर रस्तेखोदाईस परस्पर परवानगी दिली. मात्र परवानगीपेक्षा जादा अंतर खोदाई करीत रस्त्याची चाळण सुरू केल्याचा आरोप नगरसेवक दिलीप पाटील व प्रियांका बंडगर यांच्यासह अनेक सदस्यांनी केला.

दिलीप पाटील म्हणाले, सांगलीवाडीत लक्ष्मी मंदीर ते डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, शाळा नंबर नऊ, झाशी चौक अशा रस्त्यावर केबलसाठी चरखोदाई सुरू केली आहे. हे अंतर प्रशासनाने 950 मीटर  दाखविले. प्रत्यक्षात ते  जास्त आहे. शिवाय या परिसरात नवीन रस्ते केले आहेत. त्यावर कुदळ चालविली आहे. यामुळे रस्ते खराब असून, हे काम थांबवावे
प्रियांका बंडगर म्हणाल्या, एमएसईबी रस्त्यावर प्रशासनाने 25 मीटर खोदाई होणार असल्याचे सांगितले आहे. पण या खोदाईच्या कामात मोठा गोलमाल आहे.  आरेखक सतीश सावंत यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, रिलायन्स कंपनीने मे 2016 मध्ये चरखोदाईसाठी परवानगी मागितली होती. मात्र पावसाळ्यामुळे परवानगी दिली नव्हती. आता त्यांना परवानगी दिली  आहे.  एकूण 9 किलोमीटर खोदाई होणार असून कंपनीने तीन कोटी रूपये भरले आहेत. यावर सदस्यांनी संताप व्यक्त करीत खोदाई केलेल्या आणि होणार्‍या रस्त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. सातपुते यांनी अधिकार्‍यांना पाहणी करून चरखोदाईचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले.