Fri, Apr 26, 2019 15:34होमपेज › Sangli › भाजपकडून पोलिस, प्रशासनाचा गैरवापर 

भाजपकडून पोलिस, प्रशासनाचा गैरवापर 

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 23 2018 12:20AMसांगली : प्रतिनिधी 

सांगली महापालिका निवडणुकीत भाजपकडून पोलिस व प्रशासनाचा गैरवापर सुरू आहे. मात्र, निवडणुकीनंतर हुडकून काढून अधिकार्‍यांचा हिशेब करू, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी रविवारी येथे केला. भाजप नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या हस्ते हरिपूर येथील बागेतील श्री  गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून शक्‍तिप्रदर्शन केले.

काँग्रेस भवनसमोर झालेल्या प्रचार सभेत आघाडीच्या नेत्यांची घणाघाती भाषणे झाली. सर्वच नेत्यांनी भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली.आमदार पाटील म्हणाले, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना सांगली महापालिकेला भरघोस निधी दिला; पण गेली चार वर्षे भाजप सत्तेवर आहे, त्यांनी सांगलीवर जाणीवपूर्वक अन्याय  केला आहे. या शहरातील नागरिकांनी भाजपचा आमदार निवडून दिला असतानाही सरकार त्याचे उत्तरदायित्व विसरत आहे. खरे तर भाजप नेते केवळ आश्‍वासने देण्याव्यतिरिक्‍त काहीही करू शकत नाहीत. 

ते म्हणाले, कल्याण-डोंबविली महापालिका निवडणुकीवेळी साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; पण त्यांनी आजतागायत एक रुपयाही तिथे दिला नाही. भाजप नेते जितके बोलतात त्याच्या 5 टक्केही काम करीत नाहीत. सर्व समाजाला फसविण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत या समाजांना भूलथापा मारुन  फसविले आहे. पुरोगामी सांगलीत शिरू पाहणार्‍या या प्रतिगामी विचारांच्या चंचू प्रवेशाला जनतेने खड्यासारखे बाजूला करावे. 

ते पुढे म्हणाले, निवडणुकीत काही चालणार नाही, असे दिसताच भाजपने पोलिस व प्रशासनाचा गैरवापर  सुरू केला आहे. सत्तेच्या जोरावर अधिकार्‍यांद्वारे आघाडीच्या उमेदवारांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे.  पोलिसांकडून धाक दाखविला जात आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत नोटीसा बजावल्या जात आहेत. अधिकारीही भाजपला सामील झाले आहेत. पण सर्वांनी हे लक्षात ठेवावे, की  चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असतात. निवडणुकीनंतर अधिकार्‍यांना हुडकून काढून अशा ठिकाणी हद्दपार करू, की ते असे पुन्हा वागणार नाहीत. प्रत्येकाचा हिशेब करण्याची ताकद आमच्यात आहे, हे भाजपचेे नेते आणि अधिकार्‍यांनीही लक्षात ठेवावे. 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, 2014 मध्ये झालेल्या चुका विसरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत.  भाजपने गेल्या चार वर्षांत काय काम केले, हा संशोधनाचा विषय आहे. सांगलीच्या विकासासाठी एक दमडीही भाजपने दिली नाही. त्यांच्या भूलथापांना भुलून जवळ गेलेले खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना हे त्यांना सोडून चालले आहेत. जो पक्ष आपल्या मित्र पक्षांना सांभाळू शकत नाही, तो जनतेला काय सांभाळणार? 

ते म्हणाले, मराठा, धनगर, मुस्लिम समाजाची मोठी फसवणूक भाजपने केली आहे. केवळ जाती-धर्मांत विष कालवून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. महाराष्ट्रात कधीही नव्हता इतका सामाजिक ताण-तणाव आता आहे. सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या भाजपची विश्‍वासार्हता आता संपू लागली आहे. 
आमदार डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले,  भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे.  जाती-धर्मांत तेढ निर्माण करुन मोठ-मोठी आश्‍वासने देऊन सामान्यांना फसविण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे सांगलीतील जनतेने 2014  प्रमाणे चूक करू नये. बॅगा, ट्रक भरून येतील, पण त्याला भुलू नये. 

माजी  मंत्री प्रतीक पाटील म्हणाले,  महापालिकेचा निधी वापरून झालेले रस्ते सांगलीचे आमदार ‘मी केले’  म्हणून सांगत फिरत आहेत. थापा मारणार्‍यांच्या ताब्यात महापालिका दिली तर नागरिकांवर करांचा मोठा बोजा  पडेल. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील म्हणाल्या, महापालिका क्षेत्रात काँग्रेसने सुमारे 400 कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. जातीयवादी शक्‍तींना रोखण्यासाठी आघाडी झाली आहे. आघाडीमुळे काही निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, याची खंत मला आहे. (कै.) मदनभाऊ पाटील यांना विजयाची श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी नाराजी विसरुन पक्षाचे काम करावे. यावेळी विशाल पाटील, कमलाकर पाटील, सुरेश पाटील, संजय बजाज, विनया पाठक यांची भाषणे झाली. पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले.  बिपीन कदम यांनी आभार मानले.  व्यासपीठावर श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे, प्रकाश सातपुते, नामदेव कस्तुरे, सागर घोडके, मालन मोहिते, आनंदराव मोहिते, राहुल पवार, ताजुद्दीन तांबोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजपचे ‘आऊटगोईंग’ करा 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजप हा पक्ष केवळ ‘इनकमिंग’वर चालणारा आहे. सत्तेसाठी ते कोणालाही प्रवेश देत आहेत. सांगली महापालिकेतही ते आमच्यातील नाराजांना गळ लावून बसले होते; पण त्यांचे काहीच चालले नाही.इनकमिंगवर चाललेल्या या पक्षाला आता  जनतेने ‘आऊटगोईंग’ करण्याची वेळ आली आहे.