Tue, May 21, 2019 00:53होमपेज › Sangli › इनकमिंगसाठी भाजपची फिल्डिंग गतिमान

इनकमिंगसाठी भाजपची फिल्डिंग गतिमान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : अमृत चौगुले

महापालिका निवडणुकीचे ‘मिशन सत्ता’ फत्ते करण्यासाठी स्व:बळाऐवजी भाजपने इनकमिंगवर जोर दिला आहे. त्यासाठी चर्चेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील इच्छुक आजी-माजी नगरसेवकांसोबत चर्चेला गती दिली आहे. त्यातून काहीजण आता या पक्षात उमेदवारीचे प्रबळ दावेदार बनले आहेत. यासाठी महसूलमंत्री, आमदार, खासदारांसह स्थानिक नेत्यांचा ‘डे टू डे’ संपर्कही सुरू आहे. याचबरोबर स्वाभिमानी, मनसेसह अन्य पक्षांच्या ताकदवर कार्यकर्ते, नगरसेवकांशीही चर्चा सुरू आहे. एकूणच अशा 30-35 जणांच्या इनकमिंगवरच भाजपची महापालिका सत्तेची मदार आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपला मात्र सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात गेल्या तीन-चार वर्षांत अद्याप तेवढा पाय रोवता आला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतून आहे त्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर महापालिकेचे सत्तेचे टार्गेट पूर्ण होणे अशक्य असल्याचे नेते-पदाधिकारी मान्य करीत आहेत. त्यामुळे त्यांनी इनकमिंग हाच आमचा सत्तेचा प्रमुख धागा असल्याचे कबूल केले आहे. यामध्ये अन्य पक्षांतून गटबाजी आणि नाराजीचा फायदा घेत भाजपने इनकमिंगची व्यूहरचनाही केली आहे. त्यादृष्टीने खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या चार महिन्यांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याचे जाहीर केले  होते. तशा छुप्या भेटी-गाठीही पार पडल्या.

परंतु या सर्वांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारीची कमिटमेंट असेल तरच प्रवेश करू, अशा अटी घातल्या होत्या. काहींनी प्रभागरचना-आरक्षणानुसार निर्णय घेऊ, असेही स्पष्ट केले होते. त्यामुळे अद्याप प्रवेश झाले नव्हते. आता प्रभागरचना, आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यामुळे इच्छुकांसाठी चित्रच जवळजवळ स्पष्ट झाले आहे. यामुळे आता या विद्यमान तसेच माजी नगरसेवक, इच्छुकांनी भाजपचा संपर्क वाढविला आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीचे नेतृत्व करणार्‍या आमदार सुधीर गाडगीळ, त्यांचे शिलेदार माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार यांनी या इच्छुकांना पक्षप्रवेशाबरोबरच त्यांना उमेदवारीची कशी संधी द्यायची, याबाबतही ‘ऑन पेपर’ आखणी सुरू केली आहे. हे करताना मूळ भाजपचे इच्छुक, पूर्वी आलेल्यांना संधी देऊन चार सदस्यीय पॅनेल कसे यशस्वी होईल, याचीही तपासणी सुरू आहे. सोबतच कमिटमेंट देण्यापूर्वी याची हमी देताना त्यांच्या मागील कारकीर्दीत मतदारांमध्ये कितपत नाराजी आहे, ते विजयासाठी कितपत प्रबळ दावेदार कितपत आहेत, याचीही प्रभाग आणि आरक्षणनिहाय पडताळणी सुरू आहे.

काही प्रभागात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बर पदाधिकारी, नगरसेवकांना पर्याय देण्यास भाजपचे विद्यमान कार्यकर्ते कमकुवत ठरणार, हे उघड आहे. त्यासाठी या पक्षांतील दुसर्‍या फळीचे, उमेदवारी न मिळण्याची शक्यता नसल्याने नाराज पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी गळ टाकण्यात आल्याची चर्चा आहे. विशेषत: खणभाग, संजयनगर, विश्रामबाग व विश्रामबाग परिसर आदी परिसरात असे पर्याय सुरू आहेत. 

काही ठिकाणी स्वाभिमानीचे आजी-माजी नगरसेवक, मनसेचे पदाधिकारी आदींनाही भाजपमधून संधीसाठी कमिटमेंट सुरू आहेत. यामध्ये आरक्षणातून नगरसेवक, पदाधिकार्‍यांना संधी न मिळाल्यास त्यांच्या पत्नी, मुले, सून असे अनेक पर्याय देण्यात आले आहेत. एकूणच यातून भाजपचे इनकमिंगचे फासे आता गतिमान झाले आहेत. येत्या 15 दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होऊन इनकमिंगसाठी प्रवेशाचे सोहळे गतिमान होणार आहेत. 

एकूणच या हालचालींमुळे भाजपच्या निष्ठावंत गटातही खळबळ उडाली आहे. त्यातून काहीजणांनी नाराजीचा सूर हायकमांडपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Tags : Mission, sangli Municipal election, BJP fielding, sangli news  


  •