Mon, Jun 17, 2019 18:46होमपेज › Sangli › आता ‘मिशन महापालिका’साठी मोर्चेबांधणी

आता ‘मिशन महापालिका’साठी मोर्चेबांधणी

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 10:34PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

लोकसभा ते ग्रामपंचायतींपर्यंत जिल्हा भाजपमय झाला आहे. आता फक्‍त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील सत्ता काबीज करणे शिल्लक राहिले  आहे. त्यादृष्टीने शहर आणि ग्रामीण भागातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ‘मिशन महापालिका’ समोर ठेवून मोर्चेबांधणीला लागा, अशी सूचना भाजपच्या सर्वच नेत्यांनी  आज केली. नूतन सरपंच, सदस्य सत्कार मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत  तसा निर्धारही करण्यात आला. 

भावी महापौर कमळ चिन्हावरच निवडून आला पाहिजेत, असा दावा करीत कोणत्याही परिस्थितीत आघाडी-बिघाडी नको, असे संकेत नेत्यांनी दिले. जत नगरपालिके पाठोपाठ सांगलीतही भाजपच बाजी मारेल, असा दावाही नेत्यांनी केला. एकप्रकारे महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने भाजपने या कार्यक्रमात रणशिंगच फुंकले.

ना. पाटील म्हणाले, जिल्हा भाजपमय झाला आहे. परंतु फक्‍त सांगली, मिरज आणि महापालिका विरोधकांकडे आहे. शहराची दुरवस्था पाहता भाजप हाच विकासासाठी पर्याय आहे, अशी जनतेत भावना आहे. त्यादृष्टीने तयारीला लागू.

आमदार सुरेश खाडे म्हणाले, जत पालिका निवडणुकीत   आपणच जिंकणार. महापालिकेतही बाजी मारू. लोकांचे पूर्ण पाठबळ भाजपच्या पाठीशी असल्याने विरोधकांचे शेवटचे साम्राज्य नेस्तानाबूत होईल. जिल्हा खर्‍या अर्थाने पूर्ण भाजपमय होईल.

भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, जतचे मैदान सुरू आहे. महापालिकेचेही रणांगण जवळ आले आहे. शहर जिल्हाध्यक्ष सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करू. येथेही भाजपचीच सत्ता आली पाहिजे. यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी तळ ठोकावा. पै-पाहुण्यांपर्यंत भाजपच हा शहराच्या विकासाला पर्याय आहे, हे  पटवून द्यावे. पण सत्ता  भाजपच्या चिन्हावरच आली पाहिजे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष पणे आघाडी नकोच, असे  संकेत दिले.