Sun, May 26, 2019 00:49होमपेज › Sangli › फाईल गहाळ; अधिकार्‍यांवर फौजदारी करा

फाईल गहाळ; अधिकार्‍यांवर फौजदारी करा

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: May 31 2018 11:12PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या विकासकामांच्या फाईल गहाळ झाल्याचा धक्‍कादायक प्रकार गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आला. यावरून सदस्यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले संबंधितांवर फौजदारीची मागणी केली. सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी सोमवारी सकाळपर्यंत गहाळ फाईल मिळाली नाही, तर शाखा अभियंता डी.डी.पवार यांच्यावर फौजदारी करा, असे  आदेश दिले. ड्रेनेज योजनेच्या रखडलेल्या कामांवरूनही गदारोळ झाला. शिवराज बोळाज, दिलीप पाटील यांच्यासह सदस्यांनी याप्रकरणी प्रशासनाला फैलावर घेतले. पाचवेळा मुदतवाढ देऊनही ही योजना पूर्ण होणार नसेल तर उपयोग काय, असा जाब बोळाज यांनी विचारला. याप्रकरणी पुढील सभेत ठेकेदार, जीवन प्राधीकरणच्या अधिकार्‍यांनी उपस्थित राहून लेखी लेखाजोखा देण्याचे आदेश सातपुते यांनी दिले.

सातपुते म्हणाले, सांगलीतील लतीफ पठाण कॉलनीत रस्ता रुंदीकरण आणि त्याच्या डांबरीकरणाचा वाद सुरू आहे. वास्तविक हे रस्त्याचे काम अपूर्ण झाले आहे. उर्वरित कामाच्या मंजुरीसाठी नगरसेवक महेंद्र सावंत यांनी बांधकाम विभागात फाईल दिली होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही फाईल सापडत नव्हती. एकूणच बांधकाम विभागात फाईल गायब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ते म्हणाले, फाईल पदाधिकार्‍यांना दाखविण्यासाठी नेली म्हणून नगरसेविकेवर आयुक्‍तांनी फौजदारीचे आदेश दिले. आता अधिकार्‍यांनी  फाईल गहाळ केल्या आहेत. मग संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी का करीत नाही? याप्रकरणी अभियंता पवार यांच्यावर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी सावंत यांनी सभेत केली.

दिलीप पाटील म्हणाले, मारूती चौकातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शिवाजी पुतळा ते पाटील टी डेपोपर्यंत 26 लाख रुपये खर्चून जलवाहिनी टाकली  आहे. निविदा रक्कमेपक्षा 12 टक्के जादा दराने कामाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे.  आयुक्तांनी दर कमी करण्यासाठी ठेकेदाराशी वाटाघाट केली नाही. हे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर विषय मंजुरीसाठी आणला आहे. पाटील  म्हणाले, प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीचे नियोजन केले नाही. मुरमीकरण व क्रॉस पाईपची निविदा प्रक्रिया देखील झाली नाही. निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला बदनाम करण्यासाठी  सुरू असलेला हा उद्योग थांबवा.मुरमीकरणासाठी प्रभाग निहाय पाच लाखांची तरतूद तात्काळ करा. अधिकार्‍यांनी  आयुक्तांची मान्यता घेऊन तरतूद करण्याची ग्वाही दिली. 

प्रशासन भाजपच्या इशार्‍यानेच चालते

भाजपच्या पदाधिकार्‍यांनी स्फूर्ती चौकात स्वागत कमान उभारणीसाठी रस्त्याची खोदाई करून चाळण केली आहे. त्याला जनतेने विरोध केला.  हा विषय स्थायीतही गाजला. सौ. मृणाल पाटील म्हणाल्या, रस्त्यावर स्वागत कमान लावण्यासाठी मनपाची परवानगी घेतली होती का? प्रशासनाने कमानीसाठी बुधवारी परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र हे काम मंगळवारपासून सुरू झाले होते. सौ. पाटील म्हणाल्या, सामान्यांना डिजिटल लावायला बंदी करता, मग भाजपला का परवानगी दिली? विकास चौक-गव्हर्मेंट कॉलनी परिसरात माझ्या प्रयत्नाने रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. त्यातील तीन रस्ते झाले. पण एक रस्ता खासदार समर्थक कार्यकर्त्याच्या आग्रहाने प्रशासनाने अडविला आहे. भाजप नेत्यांच्या इशार्‍यानेच प्रशासन चालते.