Tue, Jun 25, 2019 15:33होमपेज › Sangli › दरोडेखोरांचा धुमाकूळ; पोलिसांवर हल्ला

दरोडेखोरांचा धुमाकूळ; पोलिसांवर हल्ला

Published On: Jan 12 2019 1:33AM | Last Updated: Jan 11 2019 11:55PM
मिरज : शहर प्रतिनिधी

मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे गुरुवारी रात्री बारा वाजता पाटील वस्तीवर आठ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. त्यांनी आठ हजारांंची रोकड, मंगळसूत्र, कर्णफुले पळवून एकूण सुमारे लाखाचा ऐवज लुटला; तर दोघांवर चाकूने हल्ला केला. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी वड्डी येथे कोम्बिंग ऑपरेशन केले. तेथून या दरोड्यातील संशयित कलिंग ऊर्फ कल्ल्या सुनील भोसले (वय 35, रा. वड्डी) याला अटक करण्यात आली; मात्र यावेळी  वस्तीवरील रहिवाशांनी पोलिसांवर हल्ला केला. जोरदार दगडफेक केली. पोलिसांचा चावा घेतला. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले. 

याप्रकरणी जानकी गौडा भोसले, छायाक्का सुनील भोसले, छाया ऋषिकेश पवार, मनीषा पाटील भोसले, शोभा अशोक भोसले (सर्व रा. वड्डी) या महिलांना अटक करण्यात आली. पोलिसांवर हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पोवार यांनी दिली.  

 राहुल बाळासाहेब पाटील (वय 25, रा. मल्लेवाडी) यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. मल्लेवाडी येथे मालगाव ते बेडग रस्त्यावर पाटील वस्ती आहे. तेथे राहुल, त्यांचे भाऊ महावीर, आई जयश्री, वडील बाळासाहेब  राहतात. गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर बॅटरीचा  प्रकाश पडला. त्यामुळे राहुल व महावीर यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांना कोणीच दिसले नाही. त्यामुळे ते दरवाजा बंद करून घरात बसले. 

त्यानंतर पाच मिनिटांतच सहा जण घराजवळ आले. त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले; पण पाटील यांना ते चोरटे असल्याचा संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडला नाही. काही वेळाने  चोरट्यांनी दरवाजावर मोठा दगड घातला. त्यामुळे दरवाजाला मोठे भोक पडले. तरीही पाटील यांनी दरवाजा उघडला नाही. राहुल व महावीर यांनी दरवाजा रोखून धरला. 

 चोरट्यांपैकी एकाने दरवाजाच्या तुटलेल्या भागातून चाकूने  महावीरच्या  पायावर वार केला. महावीर जखमी झाला. त्यामुळे महावीर व राहुल यांना दरवाजा सोडावा लागला. ते सहा चोरटे आत गेले. त्यांनी जयश्री यांच्यावर चाकूने  वार करीत त्यांच्या गळ्यातील  मंगळसूत्र, कर्णफुले (तीन तोळे, किंमत 1 लाख रूपये) असे दागिने लुटले. 

त्यानंतर “तुमच्याकडे असलेले दागिने, पैसे द्या’’ असा दम   दिला. तसेच  घरात  शोधाशोध केली. त्यांना घरात आठ हजार रूपयांची रोकड सापडली.  दहा तोळ्यांचे चांदीचे दागिनेही त्यांनी  लंपास केले. अर्धा तास हा प्रकार सुरू होता. नंतर  चोरटे पसार झाले. 

सहा चोरटे आत आले होते तेव्हा त्यांचे दोन साथीदार घराबाहेर थांबले होते. चोरटे गेल्यानंतर पाटील यांनी  गावातील काहींना व पोलिसांना दूरध्वनी केला. दहाव्या मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गावातील अनेकांनी पाटील वस्तीकडे धाव घेतली.  

घटनास्थळी पोलिसांना एका चोरट्याचे हातमोजे मिळाले. पोलिस उपधीक्षक अनिल पोवार, मिरज ग्रामीणचे प्रभारी अधिकारी टिपरसे यांनी श्‍वानपथकाच्या सहाय्याने माग काढला. मल्लेवाडीहून वड्डीकडे  जाणार्‍या रस्त्यावर सुमारे सहा किलोमीटर अंतरापर्यंत श्‍वानाने माग काढला. 

त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे  निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उपनिरीक्षक अमितकुमार हे फौजफाट्यासह वड्डी येथे दाखल झाले.  गावातील एका वस्तीवर त्यांनी कोंम्बिंग ऑपरेशन केले. यावेळी  पोलिसांवर  तेथील महिलांनी  व तेथील रहिवाशांनी तुफानी दगडफेक करीत कोम्बिंग ऑपरेशनला   मज्जाव केला. त्या दगडफेकीत पोलिस विनोद कदम यांच्या  डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले.  एका महिलेने पोलिस किशोर कदम यांच्या हाताला चावा घेतला.  ते जखमी झाले.  

तेथे कलिंग ऊर्फ कल्ल्या सुनील भोसले हा संशयित सापडला. त्याने व त्याच्या अन्य साथीदारांनी मिळून हा दरोडा टाकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.  शुक्रवारी रात्री त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. शनिवारी त्याला मिरज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू... उपअधीक्षक पोवार म्हणाले,  या दरोडा प्रकरणातील संशयीत कल्ल्या याला अटक करण्यात आली. मात्र या दरोड्यातील त्याचे  साथीदार  फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. 

चोरट्यांच्या बंदोबस्ताची मागणी  ग्रामीण भागामध्ये चोर्‍या  आणि दरोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे  या चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी उपअधीक्षक पोवार यांच्याकडे सुराज्य यूथ फौंडेशनचे धनराज सातपुते, गणेश तोडकर, अविनाश पाटील व ग्रामस्थांनी केली.