Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › मिरज रेल्वेस्थानक होणार मॉडेल

मिरज रेल्वेस्थानक होणार मॉडेल

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 8:21PMमिरज : जे. ए. पाटील

रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मिरज रेल्वे जंक्शन येत्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याचा तसेच रेल्वेपूरक उद्योग देण्याची घोषणा केल्याने मिरज रेल्वे जंक्शन दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील प्रमुख केंद्र बनणार आहे. तर मिरज रेल्वे स्थानकाची इमारत अद्ययावत करण्यात येणार असून हे स्थानक आता मॉडेल स्थानक म्हणून विकसित होणार आहे.

मिरज रेल्वे जंक्शनला दीडशे वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. हे स्थानक तसेच रेल्वे मार्गांची संस्थानकाळ तसेच  ब्रिटीश राजवटीत निर्मिती झाली आहे. यामुळे या स्थानकाला ऐतिहासिक महत्व आहे. येथून देशाच्या कानाकोपर्‍यात रेल्वेने जाण्याची व मालवाहतुकीची सोय आहे. दिवसभरात मिरजेतून  70 ते 75 पॅसेंजर, एक्स्प्रेस व साप्ताहिक रेल्वेगाड्या धावतात. तितक्याच मालवाहू गाड्यांही ये-जा करतात. 24 तासात सुमारे 1 लाख प्रवाशांची ये-जा होते. रेल्वेला कोट्यवधींचे उत्पन्न येथून मिळते.

सुरुवातीच्या काळात मिरज जंक्शन हे नॅरोगेज, मीटरगेज आणि ब्रॉडगेज या तिहेरी  मार्गाने जोडले गेले होते. कालांतराने मिरज - पुणे, मिरज - बंगळुरू आणि मिरज - लातूर या मागार्ंचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले. यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या वाढली. गंगानगर-तिरुचिरापल्ली, उदयपूर-म्हैसूर या दोन हमसफर गाड्याही सुरू झाल्या आहेत. यातून मिरज आता देशात प्रमुख रेल्वेमार्गापैकी एक मार्ग झाला आहे.

मिरज रेल्वे जंक्शन, नवीन रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण व दुहेरीकरणाच्या कामाला केंद्रात भाजप सरकार  आल्यानंतर चालना मिळाली.  तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे कामांना गती दिली. 

पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण, मिरज-कोल्हापूर व मिरज-कुर्डुवाडी या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणासह इतर पूरक कामांना 4 हजार 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना येथे रेल्वेचा मॉल मंजूर करण्यात आला होता. या मॉलचीही उभारणी आता गतीने सुरू आहे. हा मॉल सुमारे 500 कोटींहून अधिक रकमेचा होतो आहे. 

रेल्वेकडून गेल्या दोन वर्षात अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. वायफाय, कोच इंडिकेटर, स्थानकात रेल्वे मार्गाचे काँक्रिटीकरण, लिफ्ट, नवीन पादचारी पूल उभारणीच्या कामाला गती आली आहे. सुमारे 5.5 ते 6 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. 

मिरज रेल्वे स्थानकाची इमारत अद्ययावत करण्यात येणार आहे. आता हे  रेल्वेस्थानक एक मॉडेल स्थानक म्हणून होणार आहे.  रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मिरज स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेतही मोठी बचत होणार आहे. मात्र सात ते आठ वर्षात लांबपल्ल्याच्या गाड्या वाढल्या नाहीत. आठवड्यातून दोनदा कोल्हापूर-नागपूर ही गाडी धावते. कोल्हापूर-सोलापूर व मिरज-सोलापूर या दोन एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस व मिरज-परळी पॅसेंजर गाड्या धावतात. 

भविष्यकाळात पूर्व भारत जोडण्यासाठी कोल्हापूर व मिरज येथून हैद्राबाद, भुवनेश्‍वर आणि कोलकाताकडे लांबपल्ल्याच्या गाड्या सोडण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांच्या मागणीवरुन कोल्हापूर-मिरज-पुणे हा मार्ग हुबळीच्या दक्षिणमध्य रेल्वेतून काढून मध्यरेल्वेच्या पुणे विभागात जोडण्यात आला आहे. या विभागाकडून रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. गेल्या चार वर्षात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून काही नवीन रेल्वेमार्गांची आणि नजीकच्या कर्नाटकातील बेळगावी, विजापूर जिल्ह्यातही नवीन मार्गांची घोषणा करण्यात आली आहे.  यामध्ये प्रामुख्याने कराड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी, लोणंद-पंढरपूर, पंढरपूर-विजापूर, मिरज-विजापूर, शेडबाळ-विजापूर, कुडची-बागलकोट या रेल्वेमार्गांचा समावेश आहे.  मिरज येथे स्वतंत्र डिव्हीजन सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीला सिन्हा यांनीही  प्रतिसाद दिला आहे.