होमपेज › Sangli › मिरजेत तरुणास पोलिसांकडून मारहाणः पत्नीची तक्रार

मिरजेत तरुणास पोलिसांकडून मारहाणः पत्नीची तक्रार

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 11:48PM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

मटका प्रकरणात संशयित म्हणून  ताब्यात घेतलेल्या अल्लाऊद्दीन बाबालाल बगारे ( वय 30)या तरूणास पोलिसांनी मारहाण केली आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी अल्लाऊद्दीनची पत्नी मर्जिना यांनी पोलिस अधीक्षकांकडे  निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान असा मारहाणीचा प्रकार घडलाच नसल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले. 
बुधवारी (दि. 6) रोजी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी मटका प्रकरणी अल्लाउद्दीन याच्यावर कारवाई केली होती. पोलिस ठाण्यातच त्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे. दरम्यान पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी या तक्रारीची चौकशी सुरू केली आहे.

याबाबत मर्जिना बगारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुधवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मी व माझे पती मालगाव येथे नातेवाईकांकडे जात  होतो. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या खिशात चिठ्ठी व पन्नास रूपये जबरदस्तीने घातले. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात नेले. मीही पोलिस ठाण्यात गेले. माझ्यासमोर माझ्या पतीला पोलिस बाळासाहेब निळे व साईनाथ ठाकूर या दोघांनी पट्ट्याने व काठीने मारहाण केली. मी विनंती करूनही ते ऐकत नव्हते. त्या मारहाणीत माझे पती बेशुद्ध पडले. त्यानंतर त्याच पोलिसांनी त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यांच्या मारहाणीमुळे माझ्या पतींना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. 

दरम्यान अ‍ॅड. अमित शिंदे यांनी बगारे यांची रूग्णालयात भेट घेतली.  पोलिस मारहाणीचे प्रकार घडत असतील तर त्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अ‍ॅड. प्रविणा हेटकाळे यांनीही पोलिस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली आहे. पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.  दरम्यान या पोलिस ठाण्याचे निरीक्षक पिंगळे म्हणाले, आमच्या कोणत्याही पोलिसाने बगारे याला मारहाण केली नाही.  मटका प्रकरणी रीतसर कारवाई केली आहे. पुढची कारवाई टाळण्यासाठी बगारे यांचा हा बनाव आहे. याबाबत पोलिस ठाण्यातील सीसीटिव्ही फुटेज उपविभागीय पोलिस अधिकारी धीरज पाटील यांच्याकडे दिले आहे. त्या सीसीटिव्हीमध्ये स्पष्ट फुटेज  आहे. उपअधीक्षक धीरज पाटील म्हणाले, या प्रकरणाची सध्या मी चौकशी करीत आहे. सीसीटिव्ही फुटेजही घेतले आहे. लवकरच या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे दिला जाईल.