Mon, Apr 22, 2019 02:28होमपेज › Sangli › अतिक्रमणामुळे मिरज होतेय बकाल 

अतिक्रमणामुळे मिरज होतेय बकाल 

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 8:13PMमिरज : जालिंदर हुलवान

ऐतिहासिक शहर असणार्‍या मिरजेला सध्या बकाल स्वरूप आले आहे. शहरात बेकायदा बांधकाम व अतिक्रमणाचा सपाटा सुरूच आहे. शहरात दररोज वाढत असणार्‍या झोपड्या,  रेल्वे स्थानक, एस.टी. स्टँड व अन्य ठिकाणी असणार्‍या खोक्यांमुळे, हातगाड्यांमुळेच शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्याकडेला अनेक झोपड्या, घरे अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत. सांगली, मिरज, कुपवाडची महापालिका होऊन 20 वर्षे पूर्ण झाली; पण हे ऐतिहासिक शहर सुंदर शहर काही होवू शकले नाही. 

मिरज शहर हे ऐतिहासिक शहर आहे. पण इथल्या अनेक जागांवर, रस्त्यांवर अनेक ठिकाणी झोपड्या, खोकी, हातगाड्यांमुळे शहराला भकास स्वरूप आले आहे. शहरातील काही अतिक्रमण हटविण्यात आले पण अन्य ठिकाणी असणारे अतिक्रमण हटवून शहर स्वच्छ करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात विनापरवाना बांधकाम असणारी अनेक घरे आहेत. इमरतींवरील मजलेही बेकायदेशीरपणे बांधण्यात आले आहेत. अगदी गल्ली- बोळातही घराच्या बाहेर कट्टे बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. महापालिकेकडून किरकोळ स्वरूपात अतिक्रमण हटविण्याचे काम केले जाते. पण बड्या लोकांच्या बेकायदा बांधकामांवर हातोडा पडत नाही. तो हातोडा कधी पडणार? हा मुख्य प्रश्‍न आहे.

रेल्वे स्थानकाच्या समोरील बाजूस अनेक खोकी आहेत. स्थानकाच्या पूर्वेला मोठी झोपडपट्टी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या झोपड्या आहेत. गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये येथे झोपड्यांची संख्या वाढलेली आहे. रिकामी जागा दिसली की तेथे झोपड्या उभारल्या जात आहेत. आजही तेथे सिमेंटने पक्के बांधकाम केले जात आहे. सांगली-मिरज रस्त्यावर असणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाजवळ रेल्वे प्रशासनाच्या जागेवर अशाच झोपड्या आहेत. सांगली - मिरज रस्त्यावर असणार्‍या वॉन्लेसवाडी येथे रस्त्यावर कडेला अनेक झोपड्या, घरे अनधिकृतपणे बांधण्यात आली आहेत. ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे ही बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीमुळे येथे राहणार्‍यांनाच त्याचा धोका निर्माण झाला आहे. 

कोल्हापूरहून मिरजेत प्रवेश करताना मिरज शहर किती भकास झाले आहे याचा प्रत्यय प्रत्येकाला येतो. उत्तमनगरजवळील अतिक्रमण, जिजामाता उद्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर हा अत्यंत बकाल झाला आहे. दारूची दुकाने, खोक्यांची माळ, उद्यानाची दुरवस्था यामुळे हा परिसर खूपच घाणेरडा बनला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा परिसर अनेकांच्या आंदोलनानंतर चकाचक करण्यात आला आहे; पण खोक्यांमुळे परिसर अस्वच्छ असतो. येथील जनावराच्या दुय्यम बाजारातही अतिक्रमण करण्यात आले आहे. असेच अतिक्रमण डॉ. डेव्हिड हॉस्पिटल समोरही करण्यात आले आहे. 

महापालिकेच्या आयुक्त पदाचा चार्ज तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे होता. त्यावेळी त्यांनी सांगली, मिरजेत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. येथील इदगाह रस्त्यावरील सुमारे 35 वर्षांपूर्वीचे अतिक्रमण पाडून जिल्हाधिकार्‍यांनी धाडसी कारवाई केली. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला. अशी कारवाई अन्य रस्त्यांवर झालेली नाही. आता निवडणुकीचा माहोल सुरू झाला आहे. कारवाई करताना नेहमी कारभार्‍यांचा हस्तक्षेप होतो. आता निवडणुकीमुळे अधिकार्‍यांना त्यांचे अधिकार वापरण्यास चांगली संधी आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी आता कारवाईचा बडगा उगारावाच, अशी सर्वसामान्य नागरिकांतून मागणी होत आहे.