Tue, Apr 23, 2019 21:58होमपेज › Sangli › किरकोळ कारणावरून मिरजेत बालकाचा खून

किरकोळ कारणावरून मिरजेत बालकाचा खून

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 16 2018 12:10AMमिरज : शहर प्रतिनिधी

दारू व बिडी आणण्यास नकार दिल्याने गणेश यल्लाप्पा वाल्मीकी (वय 9, रा. ख्वाजा बस्ती, मिरज) याचा दोरीने गळफास लावून खून करण्यात आला. याप्रकरणी त्याचा शेजारी गणेश हणमंतआप्पा तळवार (वय 35, रा. ख्वाजा बस्ती) याला पोलिसांनी अटक केली. रविवारी सकाळी हा प्रकार घडला. 

याबाबत  गणेशची आई ज्योती वाल्मीकी यांनी महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गणेशची आई मजुरी करते. त्याचे वडील विशाळगड येथे राहतात. गणेशला लक्ष्मी नावाची पाच वर्षांची बहीण व चार वर्षांचा हणमंत नावाचा भाऊ आहे. आज, रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रेल्वेने ज्योती या कामानिमित्त मैत्रिणींसमवेत जयसिंगपूरला गेल्या होत्या. त्यावेळी गणेश, लक्ष्मी, हणमंत ही तिघे भावंडे घरीच होती. त्यांच्या घरी गणेश तळवार हा नेहमी येत असतो. ज्योती या जयसिंगपूरला गेल्यानंतर गणेश तळवार हा त्यांच्या घरी आला. तेथे त्याने वाल्मीकी या बालकाला दारू व बिडी आणण्यास सांगितले. वाल्मीकीने दारू, बिडी आणण्यास नकार दिला. 

त्यामुळे लक्ष्मी हिला बिडी आणण्यास त्याने सांगितले. ती बिडी आणण्यास गेल्यानंतर तळवार याने  गणेश वाल्मिकी या बालकाचा दोरीने गळफास लावून खून केला. खून केल्यानंतर तो तेथेच बसला होता. काही वेळाने गणेशची बहिण लक्ष्मी तेथे आली. त्यानंतर दुपारी शेजारी राहणार्‍या एका महिलेने ज्योती वाल्मिकी यांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ज्योती ह्या घरी आल्या. त्यांना त्यावेळी गणेशचा खून झाल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयीत गणेश तळवार याला ताब्यात घेतले. त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.