Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Sangli › भाजी मंडई, अरूंद रस्ते, पार्किंग प्रश्‍न कायमचेच

भाजी मंडई, अरूंद रस्ते, पार्किंग प्रश्‍न कायमचेच

Published On: May 27 2018 1:22AM | Last Updated: May 26 2018 11:04PMमिरज : जालिंदर हुलवान

प्रभाग क्रमांक चारमध्ये अरूंद रस्ते, पार्किंग, स्वच्छता, अतिक्रमण, इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन असे प्रश्‍न आजही कायम आहेत. सध्याच्या सहा नगरसेवकांचा  मिळून हा नवा प्रभाग क्रमांक चार तयार करण्यात आला आहे. या प्रभागात डॉ. पाठक हॉस्पिटल, ब्राम्हणपुरी, टांकसाळ मारूती मंदिर, दिंडीवेस, मालगाव रस्ता, इंदिरानगर, कलावतीनगर, कार्यालय रोड, पाटील हौद असा भाग येतो. या प्रभागांमध्ये अपार्टमेंटचे प्रमाण अधिक आहे. अपार्टमेंट बांधणार्‍या बिल्डर्सनी पार्किंग व्यवस्थाच ठेवलेली नाही. काही अपार्टमेंटना पार्किंग व्यवस्था आहे. मात्र अनेक अपार्टमेंटना पार्किंग व्यवस्था नाही. शिवाय कार्यालय रस्त्यावर अनेक मंगल कार्यालये आहेत. त्यांच्याकडेही पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे येथे रस्त्यावरच वाहन पार्क केले जातात. याकडे कोणीही लक्ष देऊन हा प्रश्‍न कायमचा मिटविला नाही. 

या प्रभागात मार्केटचाही काही भाग येतो. मिरजेतील मार्केट परिसरात अद्ययावत अशी भाजी मंडई बनविण्याची गरज आहे. तो प्रश्‍न भिजत पडला आहे. भाजी मंडई नसल्याने विक्रेते रस्त्यावर बसलेले असतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होतो. लोणी बाजार येथे तर विक्रेत्यांना न्यायालयानेच मज्जाव केला आहे. मात्र या विक्रेत्यांना पर्यायच नसल्याने ते रस्त्यावर बसतात. 

मालगाव रस्त्यावर इंदिरानगर झाोपडपट्टी आहे. त्यांना पक्की घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना आजही रखडली आहे. या झोपडपट्टीच्या पुनर्वसनावरून राजकारण केले जाते. मात्र तेथील रहिवाशांना पक्की घरे दिली जात नाहीत.  टाकळी-बोलवाड रस्त्यावर आसणार्‍या ओढ्याचे पाणी पावसाळ्यामध्ये शेजारील घरांमध्ये घुसते. त्यामुळे   रहिवाशांना त्याचा त्रास होतो.    

दत्त मैदान ते शिवनेरी चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. पार्किंगचे पट्टे मारलेले नसल्याने वेडी- वाकडी वाहने लावावी लागतात. दिंडीवेस पासून आळतेकर हॉलकडे जाणारा रस्त्या पूर्णपणे खराब झाला आहे. या भागातील अनेक रस्ते रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.