Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Sangli › व्यापार्‍याचे दीड लाख धूम स्टाईलने लंपास

व्यापार्‍याचे दीड लाख धूम स्टाईलने लंपास

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 09 2017 12:17AM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

येथील शंभर फुटी रस्त्यावर एका मसाल्याचा व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍याचा दोन चोरट्यांनी पाठलाग करून धूम स्टाईलने 1 लाख 66 हजार रुपयांची रोकड असणारी बॅग लंपास केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. याबाबत इकबाल मुबारक मुल्ला (वय 37, रा. हडको कॉलनी, मिरज) यांनी तक्रार दिली आहे. आज दुपारी शिवाजी रस्त्यावर असणार्‍या कॅनरा बँकेत इकबाल हे गेले होते. त्यांनी बँकेतून 1 लाख 66 हजार रुपये काढले. पाचशे, शंभर, पन्नास व वीस रुपयांच्या नोटा होत्या. त्यांनी त्या नोटा बॅगेत ठेवल्या व ते बाहेर आले. 

बँकेच्या बाहेर दोघे तरुण उभे होते. त्यांनी इकबाल यांना ‘तुमच्या अंगावर पाठीमागे घाण पडली आहे,’ असे सांगितले. त्यांनी ती घाण पुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांनाही इकबाल यांनी विरोध करून ते शंभर फुटी रस्त्यावरील हडको कॉलनी येथे असणार्‍या आनंद सागर कॉलनीत त्यांच्या घराजवळ ते आले. त्यांनी पैसे असणारी बॅग त्यांच्या भावाकडे देत असताना त्यांच्या मागून पळत आलेल्या एका तरुणाने बॅगेला हिसडा मारून पळ काढला. काही अंतरावर त्या चोरट्याचा साथीदार दुचाकी घेऊन थांबला होता. काही क्षणात ते दोघेही तेथून सुसाट निघून गेले. इकबाल यांनी आरडाओरडा केला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला.