Mon, May 27, 2019 06:43होमपेज › Sangli ›

मोदींची हुकुमशाही फारकाळ चालणार नाही

मोदींची हुकुमशाही फारकाळ चालणार नाही

Published On: Apr 05 2018 2:11AM | Last Updated: Apr 05 2018 1:47AMमिरज : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणखी फारकाळ हुकुमशाही चालणार नाही.  समाजा समाजामध्ये दुही निर्माण करुन तेढ वाढविण्याचे कारस्थान भाजप सरकारकडून केले जात आहे, अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी  बुधवारी रात्री येथे जाहीर सभेत केली. किसान चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हल्लाबोल जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्‍वासने विसरले आहेत. नगरसेवक, आमदारांना खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा वापर करायचा. हा पैसे येतो कोठून? विविध विकास कामांच्या नावाखाली स्वत: डल्ला मारायचा, आणि डल्लामार म्हणून आमच्यावर आरोप करायचा. हे आम्ही आता चालू देणार नाही.

ते म्हणाले, भीमा-कोरेगाव मध्ये राज्यसरकारने कारण नसताना जातीजातीमध्ये तेढ निर्माण केली.  यामधील खरे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. रामदास आठवले  यांना एकट्याला मंत्री केले म्हणून दलित समाजाचे सारे प्रश्‍न सुटले, असे होत नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनांचा त्यांना आता विसर पडला आहे. मराठा आणि धनगर समाजाला  आरक्षण, लिंगायत  धर्माला मान्यता देण्यास भाजप सरकार सोयीस्कर बगल देत आहे.

 पवार म्हणाले, मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या सरकारचे राज्यातील कारभारावर कोणतेही नियंत्रण नाही.तुरुंगामध्ये तरुणांना मारले जाते. पोलिस अधिकारीच महिला पोलिस अधिकार्‍यांची हत्या करीत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. भाजपमध्ये आला की त्याचा मोक्का लावायचा नाही, विरोधात गेला की  लावायचा, असा याचा कारभार आहे, अशी टीका करून ते म्हणाले, बडे कारखानदार धार्जिणेे धोरण स्वीकारुन छोटे उद्योग मोडीत काढले. तरुणांना नोकर्‍या मिळाल्या नाहीत. स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत. छपन्न इंच  छाती असणारा पंतप्रधान कोठे आहे, असा सवालही त्यांनी केला.

आमदार  जयंत पाटील म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या यूपीए सरकारच्या कालावधीत ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली. परंतु मोदी यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थाच मोडून काढली. यूपीए सरकारच्या कालावधीत भाजपने केलेले सर्व आरोप खोटे ठरले आहेत. डॉ. मनमोहनसिंग बोलायचे कमी काम मात्र जास्त करायचे. आताचे पंतप्रधान निव्वळ घोषणाबाजी करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी,  जिल्हाउपाध्यक्ष मनोज शिंदे, छाया पाटील, बाळासाहेब होनमोरे, प्रमोद इनामदार यांची भाषणे झाली. सभेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, चित्रा वाघ,  आमदार हसन मुश्रीफ,  माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,  विलासराव शिंदे, मैनुद्दीन बागवान इत्यादी उपस्थित होते.
 

 

 

tags : Miraj,news, Prime, Minister, Narendra, Modi ,dictatorship, Intrigue,Kisan, Chowk, Sabha, Miraj,