Sun, May 26, 2019 21:23होमपेज › Sangli › बेकायदा जमीन व्यवहार आठशे जणांना नोटिसा

बेकायदा जमीन व्यवहार आठशे जणांना नोटिसा

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 1:00AMमिरज : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासह मिरज तालुक्यात गुंठेवारी जमीन, इनाम जमीन निवासी व वाणिज्य  अनियमित वापरप्रकरणी सुमारे 800 जणांना दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस बजावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली. मिरज तालुक्यात गेल्या काही वर्षांत विनापरवाना जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. या जागेमध्ये प्लॉट पाडून विक्रीचेही व्यवहार झाले असून निवास तसेच अन्य कारणांसाठी त्याचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल निधी बुडाला आहे. त्यामुळे अशा जमिनीचा आणि संबंधित मिळकतधारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती  घेण्यात आली  असल्याने संबंधीतांमध्ये खळबळ उडाली आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांमध्ये तसेच लगतच्या गावामध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. गुंठेवारी नियमितीकरणाच्या धोरणाचा लाभ उठवत खरेदी विक्रीचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. यामध्ये जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे अनेक जण गब्बर झाले आहेत. संबंधीत मिळकत धारकांना चालू बाजारभावाच्या किंमतीवर 75 टक्के दंड आकारणी तरतूद असल्याने ज्यांना नोटीसा मिळाल्या आहेत. त्यांची आता राजकीय नेत्यांकडे धावाधाव सुरू झाली आहे. गेल्या काही वषार्ंत कृष्णा नदीवरील वाळू ठेके रद्द आहेत. त्यामुळे दरवर्षी 35 कोटींहून अधिक रकमेचा महसूल गोळा करुन देणार्‍या मिरज तालुक्यात उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाने आता बेकायदा झालेल्या खरेदी विक्री व्यवहारांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.

 सांगली, मिरज, कुपवाड शहरातील शासकीय जमिनी तसेच बेकायदा व्यवहारातील जमिनींचा शोध घेण्यासाठी दहा अतिरिक्त तलाठी तैनात करण्यात आले आहे. तर दि. 25 जानेवारी रोजी इनामी जमिनींचे बेकायदा व्यवहार बंद भरुन नियमीत करण्यासाठी तहसील कार्यालयात शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.