Thu, Mar 21, 2019 11:18



होमपेज › Sangli › कृष्णेच्या लाभक्षेत्रातील पिकांची हवाई ड्रोनद्वारे मोजणी

कृष्णेच्या लाभक्षेत्रातील पिकांची हवाई ड्रोनद्वारे मोजणी

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 12:47AM



मिरज : प्रतिनिधी

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाण्यावरील सिंचन क्षेत्राची हवाई ड्रोनद्वारे मोजणी करण्यास पाटबंधारे मंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे लाभ क्षेत्राच्या प्रत्यक्ष नोंदणीमध्ये निर्माण होणारी तफावत कळणार आहे. हवाई ड्रोनद्वारे होणारी पीक क्षेत्राची मोजणी दरमहा केली जाणार आहे. त्यामुळे ऊस, द्राक्षे, हळद या नगदी पिकांसह फळे, भाजीपाला या क्षेत्राची खरी वस्तुनिष्ठ लागवडीचे क्षेत्र किती आहे हे शासनास समजणार आहे. या आधारे पाणी पट्टीची नव्याने आकारणी होण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीच्या कराड पासून राजापूर बंधार्‍यापर्यंत दोन्ही बाजूस लाभ क्षेत्रातील पिकांची हवाई ड्रोनद्वारे पाहणी संदर्भात पाटबंधारे मंडळाने संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

या सर्व क्षेत्राची हवाई ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येऊन प्रत्यक्ष पडताणी करण्यात येऊन त्याची सत्यता व निश्‍चिती करण्यात आल्यानंतर पूर्वी देण्यात आलेली मंजूर व त्याचे दर या सर्व माहिती एकत्रित केली जाणार आहे. दरवर्षी पावसाचे वाहून जाणारे पाणी आणि कोयना व वारणा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यावर निर्माण होणारे सिंचन क्षेत्र आणि प्रत्यक्षामधील नोंदणी यामध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या कामाकरीता कर्मचार्‍यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये शासनास खर्च करावे लागतात. हवाई ड्रोनद्वारे होणार्‍या पाहणीमुळे सिंचन क्षेत्राची अचूक माहिती तीही अत्यल्प खर्चात उपलब्ध होणार  आहे.