Thu, Apr 25, 2019 13:38होमपेज › Sangli › शासनाचा निषेध; काँग्रेस-भाजपमध्ये खडाजंगी

शासनाचा निषेध; काँग्रेस-भाजपमध्ये खडाजंगी

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 11:07PM

बुकमार्क करा
मिरज : प्रतिनिधी

शासनाने म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी टंचाई निधीतून रक्कम द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. दरम्यान शासनाचे अभिनंदन व निषेध करण्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सभापती जनाबाई पाटील अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामसेवकांचे सामुदायिक रजा आंदोलन आणि महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायतीमार्फत कर आकारणीच्या मागणीवरुनही जोरदार चर्चा झाली. पशुसंवर्धन विभागावरील चर्चे दरम्यान भाजपचे विक्रम पाटील यांनी तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या लाळीची लस उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावरुन काँग्रेसचे अनिल आमटवणे, कृष्णदेव कांबळे, रंगराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक मोहिते, अजयसिंह चव्हाण आदि सदस्यांनी जोरदार हंगामा करुन शासनाच्या निषेधाचा ठराव करण्याची मागणी केली.  

पशुसंवर्धन व विकास अधिकारी डॉ. एस. पी. सोनवणे यांनी  अद्याप लस उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. तसेच दरमहा लस उपलब्ध करण्याबाबत पाठपुरावाही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाकडून योग्य वेळी लस उपलब्ध होत नसेल तर शासनाच्या धोरणाचा निषेध करावा अशी संतप्त सदस्यांनी मागणी केली.  उपसभापती काकासाहेब धामणे यांनी वरिष्ठ अधिकारी पातळीवर पाठपुरावा करुन लस उपलब्ध करुन घेण्याचे आश्‍वासन दिले. कृषी अधिकारी एच. एस. मेडीदार यांनी यावर्षी शासनाकडून वेगवेवगळ्या  दोन कोटी निधी मिळाला असल्याचे सांगितले.  तालुक्यास भरघोस निधी मिळाल्याने शासनाचे अभिनंदन करण्याचा ठराव भाजपचे किरण बंडगर यांनी मांडला. परंतु या ठरावास काँग्रेस, राष्ट्रवादी सदस्यांनी विरोध दर्शविला.

 रंगराव जाधव, अनिल आमटवणे, अशोक मोहिते यांनी मागेल त्यास शेततळे मंजूर करताना शेतकर्‍यांना शेततळ्याच्या अस्तरीकरणासह निधी शासनाने द्यावा अशी मागणी केली. रस्त्यांच्या दर्जाबाबतही वादळी चर्चा झाली. सांगली-पेठ रस्त्याच्या दर्जाबाबतचा मुद्दा आमटवणे यांनी उपस्थित केला.  उपअभियंता बी.जे.साळुंखे यांनी संबंधीत ठेकेदाराकरुन दुसर्‍यांदा खड्डे मुजविण्यात आले आहेत. तसेच तो रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याने नवीन रस्ता करण्यात येणार आहे असे सांगितले.  मिरज  पश्‍चिम भागात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विकास निधीतून सुमारे 30 कोटींची कामे मंजूर आहेत असेही त्यांनी सांगितले. भाजपचे किरण बंडगर यांनी मिरज दिंडीवेस-मालगाव रस्त्याकरीता सुमारे 4 कोटींचा निधी आमदार सुरेश खाडे यांनी मंजूर केला असल्याचे सांगितले.

शासनाने  म्हैसाळ योजनेकरिता निधी दिला नसल्याचा मुद्दा आमटवणे यांनी उपस्थित करुन शासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला. मात्र  या व्यक्त्व्याला उपसभापती  धामणे व किरण  यांनी हरकत घेतली. म्हैसाळ योजनेलाही सुमारे 3 कोटी 80 लाखाचा निधी मिळणार असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांकडून सुमारे 3.50 कोटी जमा करुन म्हैसाळ योजना सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. अशोक मोेहिते म्हणाले, ग्रामसेवकांच्या एका संघटनेने अद्याप  काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची गैरसोय होत आहेे. तथापि  काही ठिकाणी  आंदोलन काळातही आर्थिक लाभ घेऊन दाखले देण्याचे काम सुरू आहे. आणि सर्वसामान्यांची अडवणूकही केली जात आहे. न्याय मार्गाने आंदोलन मागे घेण्यात यावे. अन्यथा संबंधीत ग्रामसेवकांवर कारवाई करावी.