Fri, Apr 26, 2019 03:35होमपेज › Sangli › मिरज अमृत पाणी योजनेची बिले रोखली

मिरज अमृत पाणी योजनेची बिले रोखली

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 22 2018 10:29PMसांगली : प्रतिनिधी

न्यायालयाने मिरजेच्या अमृत पाणी योजनेची निविदा प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. यावरून महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर हारुण शिकलगार यांच्यासह सर्वच सदस्यांनी याप्रकरणी आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली. अखेर न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत योजनेच्या ठेकेदाराची बिले न देण्याचा ठराव करण्यात आला. सोबतच याबाबत खुलासा करण्यास सांगूनही उत्तर न दिल्याबद्दल उपायुक्‍त सौ. पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश शिकलगार यांनी  दिले.

अमृत योजनेंतर्गत मिरजेसाठी 103 कोटी रुपयांची पाणीयोजना मंजूर झाली आहे. प्रशासनाने ती स्थायी समिती व महासभेच्या परस्पर जादा दराने मंजूर केली होती. याविरोधात स्थायी समिती सदस्य किशोर लाटणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.  न्यायालयाने प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. यावरून आज सभेत सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविली. गौतम पवार म्हणाले, उपायुक्तांना अधिकार नसताना त्यांच्या सहीने ठेकेदाराला वर्कऑडर देण्यात आली. आयुक्तांनी त्यांना प्राधिकृत केले असले तरी त्याला स्थायीची मान्यता घेतली गेली नाही. चार अधिकारी बंद खोलीत बसून योजना मंजुरीचा कारभार करतात. मात्र विकासकामांच्या फाईल अडवितात. प्रशासनाचा हा दुटप्पी कारभार आहे. आयुक्तांनी सभागृहात याबाबत भूमिका स्पष्ट करावी, तोपर्यंत सभा तहकूब करा. 

शेखर माने म्हणाले,   ड्रेनेज योजनेचे दहा वर्षे वाटोळे झाले. ती पूर्ण होणार नाही. आता अमृत योजनेचीही तीच वाटचाल सुरू आहे. त्यामुळे अमृत योजनेची अंतिम निकाल लागेपर्यत  आधी बिले थांबवा; अन्यथा जादा रकमेची वसुली आपल्यावर लागेल. एजी ऑडिटला आपल्याला सामोरे जावे लागेल. महापौर शिकलगार यांनी सौ. पाटील यांना खुलासा करण्यास सांगितले.  त्या म्हणाल्या, मला आयुक्तांनी वर्कऑर्डरवर सही करण्यासाठी प्राधिकृत केले होते. तेवढ्यापुरताच माझा संबंध आहे. निविदा प्रक्रियेबाबत मी बोलू शकत नाही. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट आहे. त्यावर आयुक्तच उत्तर देतील. महापौरांनी सौ. पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि   अंतिम सुनावणी होईपर्यंत ठेकेदाराचे बिल देऊ नये, असे आदेश दिले.

Tags : Sangli, Sangli News, Miraj Amrit Water Scheme, bills were stopped