Mon, Mar 25, 2019 09:07होमपेज › Sangli › मिरजेत मोबाईल, दुचाकी चोरट्यांची दहशत 

मिरजेत मोबाईल, दुचाकी चोरट्यांची दहशत 

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:02PMमिरज : जालिंदर हुलवान

मिरज  शहर आणि ग्रामीण भागांमध्ये मोबाईल व दुचाकी चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. दररोज कुठे ना कुठे मोबाईल व दुचाकीची चोरी होतेच. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या गुन्ह्याकडे पोलिस यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

मिरज शहर आणि ग्रामीण भाग हा कर्नाटकच्या  सीमेवरील भाग आहे. या भागात कर्नाटकातील गुन्हेगारांचा नेहमी राबता असतो. त्यामुळे कर्नाटकातील गुन्हेगार मिरजेत आश्रयास असतात. मिरजेतील स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने ते येथे गुन्हे करतात. हे आतापर्यंतच्या पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. जानेवारी, 

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यांमध्ये मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. शिवाय दुचाकीही चोरीस जात आहेत. शहरातील विविध भागांमध्ये दररोज दुचाकी व मोबाईलची चोरी होतेच. मोपेड गाड्यांचे कुलूप लगेच तुटत नाही. बाईक गाड्यांचे कुलूप लगेच तुटते. त्यामुळे मोपेडपेक्षा बाईक चोरीच्या संख्या जास्त आहेत. दुचाकी चोरीस गेल्या की पूर्वी कच्ची नोंद घेतली जात होती. मात्र आता थेट गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे नागरिकही तक्रार देण्यास पुढे येतात. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या नोंदीचेही प्रमाण आता वाढले आहे. मिरजेतील शहर पोलिस ठाणे, महात्मा गांधी चौकी, मिरज ग्रामीण पोलिस ठाणे, मिरज रेल्वे पोलिस ठाण्यांमध्ये या नोंदी वाढल्या आहेत. 

शासकीय रुग्णालय, रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसर, विविध खासगी रुग्णालये या ठिकाणी लावण्यात आलेल्या दुचाकींची चोरी होत आहे. शिवाय दुचाकी मालकाने त्याच्या घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकीही चोरीस गेलेल्या आहेत. 

सध्या मोबाईल चोरणे हे चोरांसाठी सोयीचे आहे. अँड्रॉईड मोबाईल हे महागडे असल्याने ते चोरी होत आहेत. या चोरट्यांनी मार्केट, आठवडा बाजार टार्गेट केले आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत अनेक मोबाईल चोरीस गेले आहेत. पूर्वी मोबाईल गहाळ झाल्याची नोंद पोलिस घेत होते. मात्र आता पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशामुळे मोबाईल गहाळ झाल्याची नव्हे तर मोबाईल चोरीस गेल्याचीच नोंद घेतली जाते. घरांमध्ये घुसूनही मोबाईलच्या चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात आलेल्या आहेत. 

 चेनस्नॅचर, एटीएममध्ये चोरी, दुकान, घरफोड्याही वाढल्या

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे प्रमाणही वाढले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये हे गुन्हे घडत आहेत. एटीएममध्ये चोरी झाली आहे. बंद दुकान व बंद घरांची कुलूपे तोडून चोर्‍या होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची गरज आहे. काही चोरट्यांना पकडून पोलिसांनी कारवाई केली आहे. सावकारांनीही सध्या धुमाकूळ घातला आहे. काही सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Tags : sangli, sangli news,  Mirage mobile, bike thieves, panic,