Wed, Jan 16, 2019 09:20होमपेज › Sangli › सांगलीत ४७ लाखांना मांडूळ’ विक्रीचा प्रयत्न दोघाजणांना अटक

सांगलीत ४७ लाखांना मांडूळ’ विक्रीचा प्रयत्न

Published On: Feb 03 2018 2:41AM | Last Updated: Feb 03 2018 2:41AMमिरज : शहर प्रतिनिधी 

जादूटोणा करण्यासाठी व विनापरवाना औषध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मांडूळ (महांडूळ) हा दुर्मीळ साप पोलिसांनी तालुक्यातील खंडेराजुरी येथे जप्‍त केला. याची तस्करी करणार्‍या हुसेन कोंडिबा तांबोळी (वय 64, रा. माधवनगर), लतीफ हुसेन जमादार (68, रा. संजोग कॉलनी, सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. मांडूळ सुमारे 47 लाख रुपयांना विकण्यात येणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले  आहे.

कवठेमहांकाळ रस्त्यावर  खंडेराजुरीच्या हद्दीमध्ये दोघेजण मांडूळ हा साप विकण्यासाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी रात्री पोलिस उपनिरीक्षक विजय गोसावी, हवालदार लक्ष्मण जाधव, धोत्रे, काळे यांनी खंडेराजुरी येथे जाऊन हुसेन व लतीफ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चार फूट लांबीचा मांडूळ साप जप्‍त केला.  

खंडेराजुरीत राहणार्‍या विक्रम कांबळे यांच्याकडून तो साप त्यांनी विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्या  सापाची ते तब्बल 47  लाख रुपयांना विक्री करणार होते असे   त्यांनी  पोलिसांना  सांगितले.
पोलिसांनी त्या दोघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली. जप्त केलेले मांडूळ ते कोणास विक्री करणार होते, याचा तपास मिरज ग्रामीण पोलिस करीत आहेत.