Thu, Jun 27, 2019 16:07होमपेज › Sangli › भाजपकडून सनातन संस्थेला अभय का

भाजपकडून सनातन संस्थेला अभय का

Published On: Dec 03 2017 1:25AM | Last Updated: Dec 02 2017 10:35PM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी 

  सत्ताधारी भाजपकडून सनातन संस्थेला  अभय का दिले जात आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे बोलताना केला. सध्या भाजपविरोधी लाट आहे. तिचा फायदा घ्या व आगामी निवडणुकीत सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये सत्ता अबाधित ठेवा असेही आवाहन त्यांनी केले.

येथील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलामध्ये काँग्रेसच्या सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, लोकांना पाहिजे असतील तेच उमेदवार निवडणुकीत द्या. आपल्याला पाहिजे असणारे देऊ नका, हाच नांदेड पॅटर्न आहे. सध्या भाजपच्या विरोधात वातावरण आहे. या वातावरणाचा फायदा घ्या आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचीच सत्ता आणा. सर्वांनी एकत्र राहून या निवडणुकीचा प्लॅन करा.

ते म्हणाले, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडत नाहीत. सनातन संस्थेला सत्ताधारी भाजप  अभय का देत आहे ? एकीकडे व्यापारी जीएसटी मुळे त्रस्त आहेत तर दुसरीकडे शेतकर्‍यांना त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, शेतकर्‍यांसाठी ऑनलाईनची भूमिका शासन घेते. त्यामुळेच सर्वत्र भाजपच्या विरोधात वातावरण आहे.  ते म्हणाले,गेल्या तीन वर्षांत काँग्रेसने अनेक आंदोलने केली, लोकांचे प्रश्‍न उचलून धारले. त्यामुळे लोक काँग्रेसवर विश्‍वास ठेवत आहेत. आता यापुढे  काँग्रेसचा आवाज बुलंद करा. दि. 12 डिसेेंबरला  नागपूरला मोर्चा आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या मोर्चामध्ये राहुल गांधी,  गुलामनबी आजाद, राष्ट्रवादीचे शरद पवार, राजू शेट्टी यांच्यासह रिपब्लिकन पक्ष, शेकाप, समाजवादी पक्षाचे नेते  सहभागी होणार आहेत.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केले. बापू जाधव यांनी सूत्रसंचालन केले.  आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार सतेज पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम,  हाफिज धत्तुरे, शैलजा पाटील, विशाल पाटील, मालन मोहिते, बसवेश्‍वर सातपुते, सत्यजित देशमुख, डॉ. चमनशेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कोथळे प्रकरण विधिमंडळात अशोक चव्हाण म्हणाले, सांगलीमधील अनिकेत कोथळेे खूनप्रकरण घडले  दुर्दैवी आहे.  अशीच प्रकरणे नांदेड व लातूरमध्येही घडली आहेत. कायदा सुरक्षेचा प्रश्‍न बिघडल्याचे दिसते आहे. याबाबत विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे.