Mon, Jan 21, 2019 09:01होमपेज › Sangli › हातगाडी परवान्यासाठी आधारकार्ड, मोबाईल आवश्यक

हातगाडी परवान्यासाठी आधारकार्ड, मोबाईल आवश्यक

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 9:28PM

बुकमार्क करा
मिरज : प्रतिनिधी

शहरात लवकरच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून हातगाड्या आधारकार्डाशी संलग्न करुन मोबाईल अ‍ॅपद्वारे जोडण्यात येणार आहे. जीओ टॅगिंगद्वारे कोणती हातगाडी कोठे आहे, तेही महापालिकेला आता समजणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरामध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी येत्या काही महिन्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे हातगाड्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न परस्पर निकालात निघणार आहे.

नवीन धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त संभाजी मेथे, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे आणि ज्योती सरवदे यांनी गुरुवारी शहरात हातगाडी चालकांशी संपर्क साधून माहिती दिली. महापालिका क्षेत्रात सांगली, मिरज व कुपवाडमध्ये अडीच ते तीन हजार हातगाडी चालक आहेत. या शिवाय परवाने नसलेलेही अनेक हातगाडीधारक आहेत. प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर एका ठिकाणी थांबून फळे, भाजीपाला व इतर वस्तू विकल्या जातात. 

त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो आणि पर्यायाने अतिक्रमणाचाही प्रश्‍न गेल्या काही दिवसांपासून वाढला  आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार शहरामध्ये हातगाडीधारकांची नोंदणी करुन संबंधीत हातगाडी आधारकार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. व मोबाईल अ‍ॅपद्वारे संबंधीत चालक जीओ टॅगिंगला जोडण्यात येणार आहे. 

तसेच शहरामध्ये हॉकर्स झोन निश्‍चित केला जाणार आहे. नेमून देण्यात आलेल्या जागेत त्यांनी व्यवसाय करायचा असून एखादा हातगाडी चालक दुसर्‍या हद्दीत गेल्यास त्याची माहिती जीओ टॅगिंगद्वारे महापालिकेस समजणार आहे. त्यामुळे  हातगाडी चालकावर कारवाई करणेही पालिकेला सुलभ होणार आहे.

नव्या नियमानुसार प्रत्येक हातगाडी चालक आधारकार्डशी संलग्न करुन मोबाईल अ‍ॅपशी जोडला जाणार असल्याने शहरात एकही अनधिकृत हातगाडी चालक राहणार नाही. हातागाडी परवान्यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, रेशनकार्ड, रहिवासी पुरावे इत्यादी प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. नवीन नियम आणि फेरीवाला धोरणामुळे हातगाडीवाल्यांची संख्या मर्यादीत राहणार असून रहदारीस अडथळाही आता होणार नाही.